अजिंक्यतारा सध्या दररोज धुमसतोय
सातारा, 28 एप्रिल (हिं.स.) : ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि राजधानीचे शहर असलेल्या सातारा शहराला एक भरभक्क
अजिंक्यतारा किल्ल्यावरून धुमसणाऱ्या धुराच्या रेषा 


सातारा, 28 एप्रिल (हिं.स.) : ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि राजधानीचे शहर असलेल्या सातारा शहराला एक भरभक्कम खंबीर वारसा लाभला आहे. तो शिवकालीन ऐतिहासिक अशा अजिंक्यतारा किल्ल्याचा. मात्र धगधगत्या उन्हात आणि चाळीस अंशाहून वाढत जाणाऱ्या तापमानात हा ऐतिहासिक अजिंक्यतारा दररोज भडक त्या ज्वालांनी पेट घेत धुमसतो आहे आणि त्यातील वनसंपदा अनेक प्राणी, कीटक, कृमी यांना मात्र या आगीच्या भक्षस्थानी पडावे लागत आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचे रान चांगलेच पेटले असताना केवळ आठ दिवसावर आलेल्या या मतदान प्रक्रियेसाठी कार्यकर्तेही आता जीवाचे रान करून निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. त्यातच लग्नसराई ही आहे . त्याचा दणका आणि बार जोरात उडत असताना निसर्गप्रेमींनी दिलेली हाक त्यांना ऐकूही येत नाही .तसेच या परिसरातील आणि प्रभागातील नगरसेवक मात्र दिसत असूनही त्याकडे कानाडोळा करत असल्यामुळे हा अजिंक्यतारा दररोज असा धुमसतो आहे. आणि आगीच्या ज्वाळनी लपेटून त्यामध्ये हजारो जीव मात्र नष्ट होत आहेत. मुकी बिचारी कुणी हाका.. या प्रत्ययावर सध्या या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याकडे पाहिले जात आहे. आणि सामान्य नागरिक ही हताशपणे या अजिंक्यतारा किल्ल्याच्या कड्या कपारीतून दिसणाऱ्या धुराच्या रेषा आणि भडकलेल्या आगीचा ज्वालांचा आगडोंब पाहून तोंडातून.. अरेरे.. असाच शब्द काढत आहेत. मात्र ही आग विझवण्यासाठी या 40° चा तापमानात कार्यकर्तेच नव्हे तर नगरपालिका प्रशासनही कमी पडत असल्याने उघडे ,बोडके डोंगर आणि जळालेली वनसंपदा पाहून निसर्गप्रेमींची हाक मात्र देण्याअगोदरच कंठामध्ये बुडून गेल्याचे दिसून येत आहे .

सात डोंगर असलेल्या सप्ततारा या नावाने सुप्रसिद्ध असलेला सातारा मात्र आता परिसरातील या जळून काळ्या पडलेल्या आणि जळालेल्या डोंगरांमुळे अधिकच विधीर्ण आणि भयावह दिसत आहे. अद्याप पावसाची प्रतीक्षा दोन महिन्याची असताना व त्यानंतर उगवणाऱ्या हिरव्या गवतासाठी अनेक समाजकंटक अशा आगी सुद्धा बिनधास्त लावतात की जेणेकरून पुढील पावसाळ्यात गवत चांगले वाढेल या मूर्ख संकल्पनेत मुळे मात्र ही वनसंपदा धोक्यात येत आहे . अनेक वेळा वाढत्या तापमानाचा पाराही चालल्याने या आगी कोणी लावत नसले तरी आपोआप पेट घेत आहेत आणि आजवर लावलेल्या अनेक स्मृती जपणारे स्मृतीवन अजिंक्यतारा वरील हिरवाई नष्ट होत आहे. त्यामुळे सिमेंटच्या जंगलामध्ये दिसणारे हे हिरवेगार डोंगर आपल्याला जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे हे गरजेचे आहे असे वाटते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande