ऍडमिरल दिनेश त्रिपाठींनी स्वीकारला पदभार
नवी दिल्ली, 30 एप्रिल (हिं.स.) : ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी आज, मंगळवारी भारतीय नौदलाचे 26 वे नौदल
निवर्तमान ऍडमिरल आर. हरिकुमार आणि ऍडमिरल दिनेश त्रिपाठी


नवी दिल्ली, 30 एप्रिल (हिं.स.) : ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी आज, मंगळवारी भारतीय नौदलाचे 26 वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ते ॲडमिरल आर हरी कुमार यांच्यानंतर हे पद भूषवत आहेत. ऍडमिरल आर हरी कुमार भारतीय नौदलातील उत्कृष्ट कारकीर्दीनंतर सेवानिवृत्त झाले आहेत.

ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी, सैनिक विद्यालय, रीवा आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासला या संस्थांचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांची 1 जुलै 1985 रोजी भारतीय नौदलाच्या कार्यकारी शाखेत नियुक्ती झाली होती. कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर तज्ञ असलेल्या ऍडमिरल त्रिपाठी यांनी नौदलाच्या आघाडीच्या युद्धनौकांवर सिग्नल कम्युनिकेशन अधिकारी, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर अधिकारी आणि नंतर गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आयएनएस मुंबईवर कार्यकारी अधिकारी तसेच मुख्य युद्ध अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे.

त्रिपाठी यांच्या सागरी सेवेत आयएनएस विनाश, आयएनएस किर्च आणि आयएनएस त्रिशूल यांचाही समावेश आहे. त्यांच्या सुमारे 40 वर्षांच्या कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या कार्यकारी पदांवर त्यांची नियुक्ती झाली आहे. यात मुंबई येथील पश्चिम आरमाराचे, आरमार परिचालन अधिकारी, नौदल परिचालनाचे संचालक, नेटवर्क केंद्रित परिचालनाचे प्रधान संचालक आणि नवी दिल्ली येथे नेव्हल प्लान्सचे मुख्य संचालक या पदांचा समावेश आहे. रिअर ॲडमिरल पदावर बढती मिळाल्यावर, त्यांनी नौदल मुख्यालय येथे नौदल कर्मचारी (नीती आणि योजना) सहाय्यक प्रमुख म्हणून आणि पूर्व आरमाराचे कमांडिंग फ्लॅग ऑफिसर म्हणून काम केले आहे.

व्हाईस ऍडमिरल पदावर बढती मिळाल्यावर, त्यांनी केरळमधील एझिमाला येथील प्रतिष्ठित भारतीय नौदल अकादमीचे कमांडंट तसेच मुंबई येथे नौदल परिचालनाचे महासंचालक, कार्मिक प्रमुख आणि पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून सेवा बजावली आहे. तसेच त्रिपाठी यांनी कोची येथील सिग्नल स्कूल, वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, कारंजा येथील नेव्हल हायर कमांड कोर्स आणि अमेरिकेतील नेव्हल कमांड कॉलेज युनायटेड स्टेट्स नेव्हल वॉर कॉलेज, येथूनही काही अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande