पंतप्रधानांसाठी माणुसकी हा धर्म- नारायण राणे
रत्नागिरी, 30 एप्रिल, (हिं. स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी माणुसकी हा धर्म आहे तर महिला,
नारायण राणे यांची प्रचार सभा


रत्नागिरी, 30 एप्रिल, (हिं. स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी माणुसकी हा धर्म आहे तर महिला, युवक, शेतकरी आणि गरीब या जाती आहेत. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रचारसभेत केले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री. राणे यांच्या प्रचारासाठी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील वाटद आणि कोतवडे जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला महासत्ता होण्याच्या दिशेने नेत असताना महिला, युवक, शेतकरी आणि गरिबांचे जीवनमान सुधारण्यासाठी कार्यरत आहेत. यावर बोलण्याचे कुठलेच मुद्दे विरोधकांकडे नसल्याने ते जातीभेद निर्माण करत आहेत. मात्र पंतप्रधान मोदींनी नेहमीच माणुसकीचा धर्म जपत काम केला असून असे नेतृत्व पुन्हा या देशाला मिळवून देतानाच आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कमळ या निशाणीवर मतदान करा. कुठलेही मुद्दे नसल्याने विरोधक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. संविधान बदलणार असा अपप्रचार सुरू आहे. पण पंतप्रधानांनी कधीच जातीभेद, धर्मभेद केला नाही, त्यांच्यासाठी माणुसकी हा धर्म आहे तर महिला, युवक, शेतकरी आणि गरीब या जाती आहेत. या जातीतील लोकांचे जीवनमान वाढावे, यासाठी ते काम करत आहेत. करोना काळातील त्यांच्या कामामुळे आपण या महामारीचा सामना करू शकलो, मोफत अन्न, मोफत घर, घराघरात पाणी, औषधपाण्यासाठी आयुष्मान भारत योजना, उज्ज्वला गॅस योजना, शेतकऱ्यांसाठी त्यांनी काम केले. भारत देश स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करत असतानाच तो विकसित, आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी पंतप्रधानाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र मोदींच्या या कुठल्याच कामापर्यंत पोहोचण्याची क्षमता विरोधकांची नसल्याने पावसाळ्यात बेडूक उगाच ओरडतात, तसे विरोधक निवडणुका आल्यावर विरोध करत आहेत.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आणि कार्यपद्धतीवर टीका केली. ते पुढे म्हणाले, या राज्याच्या मुख्यमंत्रिपदापासून मी अनेक पदांवर काम केले आहे. त्यावेळी मी जात धर्म पहिला नाही, मदत मागायला जे कोणी समोर येते त्या प्रत्येकाला मदत कारणे हे माझे कर्तव्य समजतो. सिंधुदुर्गचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रयत्न केले, तिथले जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला, मात्र विरोधकांनी रोजगार देणारे प्रकल्प घालवून तुमचे नुकसान केले आहे. आता या भागाचा विकास करत विकसित भारतामध्ये कोकणचे नाव अग्रणी करण्यासठी मी कटिबद्ध आहे, मला तुमची सेवा करायची आहे यासाठीच येत्या ७ मे रोजी मतदानाला बाहेर पडा.

यावेळी बोलताना बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, सर्वांनी जोमाने कामाला सुरुवात करा, प्रत्यके वाडीवस्तीमध्ये जा आणि महायुतीच्या वतीने ही निवडणूक देशासाठी आपले भविष्य घडवण्यासाठी आहे हे पटवून द्या, कमळाला आणि राणे साहेबांना मत देण्यासाठी काम केले पाहिजे, या मतदार संघात विक्रमी मतदान होण्यासाठी काम करा. पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, जयगड हा मच्छिमारांचा परिसर आहे. त्या दृष्टीने अनेक निर्णय घेतले आहेत, कोतवडे, खंडाळा जिल्हा परिषद गटात महायुतीची चांगली ताकद आहे. त्यामुळे इथे विक्रमी मतदान झाले पाहिजे, इथे घराघरात जाऊन प्रचार सुरू आहे. महिला पदाधिकार्यांनी प्रामाणिक काम सुरू केले आहे, इथे महिलांची ताकद मोठी आहे, त्यांना सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. आता प्रत्येकाने मोदींना पंतप्रधान करायचे आहे हे भान ठेवून काम करा.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप, कांचनताई नागवेकर, विवेक सुर्वे, प्रकाश साळवी, गजानन पाटील, विवेक सुर्वें, नगरसेवक उमेश कुळकर्णी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश शेवडे , सदस्य बाबू शेठ पाटील, योगेंद्र कल्याणकर, तारक मयेकर, अनिकेत सुर्वे, अझीम चिकटे, बापू सुर्वे, भाई जाधव यांचच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande