पद्म पुरस्कार 2025 साठी नामांकन प्रक्रिया सुरू
नवी दिल्ली, 1 मे (हिं.स.) - प्रजासत्ताक दिन 2025 चे औचित्य साधून जाहीर केल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कार
पद्म पुरस्कार


नवी दिल्ली, 1 मे (हिं.स.) - प्रजासत्ताक दिन 2025 चे औचित्य साधून जाहीर केल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कार 2025 साठी ऑनलाईन नामांकन/शिफारस प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन/शिफारशी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर (https://awards.gov.in) ऑनलाईन स्वीकारल्या जातील.

पद्म पुरस्कार, म्हणजे, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री, हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. 1954 मध्ये सुरू झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त केली जाते. हे पुरस्कार 'उत्कृष्ट कार्याच्या' सन्मानार्थ तसेच कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या सर्व क्षेत्रे/विषयांमध्ये विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरी/सेवेसाठी दिले जातात. वंश, व्यवसाय, पद किंवा स्त्री-पुरुष असा भेद न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र असतात. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता सार्वजनिक उपक्रमांसोबत काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसह सरकारी कर्मचारी पद्म पुरस्कारांसाठी पात्र नाहीत.

पद्म पुरस्कारांचे रूपांतर “लोकांचे पद्म” मध्ये करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. म्हणून, सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी स्व-नामांकनासह नामांकन/शिफारशी सादर कराव्या. महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती आणि जमाती, दिव्यांग व्यक्ती आणि समाजाची निःस्वार्थ सेवा करणाऱ्या प्रतिभावान व्यक्ती ओळखून त्यांचे असामान्यत्व आणि कर्तृत्वाची दखल घेण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जाऊ शकतात.

नामांकन/शिफारशींमध्ये उपरोक्त पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नमुन्यात निर्दिष्ट केलेले सर्व संबंधित तपशील असावेत, ज्यात वर्णनात्मक स्वरूपात (जास्तीत जास्त 800 शब्द) शिफारस केलेल्या व्यक्तीची तिच्या किंवा त्याच्या संबंधित क्षेत्रातील/विद्याशाखेतील विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरी/सेवा स्पष्टपणे मांडणारा उल्लेख समाविष्ट असावा.

या संदर्भातील तपशील गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (https://mha.gov.in) आणि पद्म पुरस्कार पोर्टलवर (https://padmaawards.gov.in) 'पुरस्कार आणि पदके' या शीर्षकाखाली देखील उपलब्ध आहे. या पुरस्कारांशी संबंधित कायदे आणि नियम https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या लिंकसह संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande