शिवसेनेकडून कल्याण, ठाणे आणि नाशिक येथील उमेदवार जाहीर
मुंबई, १ मे (हिं.स.) : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेने बुधवारी कल्याण लोकसभा मतदारसंघा
शिवसेना उमेदवार 


मुंबई, १ मे (हिं.स.) : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेने बुधवारी कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे, ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के आणि नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

आता ठाण्यात नरेश म्हस्के विरुद्ध ठाकरे गटाचे राजन विचारे, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर-राणे, नाशकात हेमंत गोडसे विरुद्ध ठाकरे गटाचे पराग (राजाभाऊ) वाजे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.

ठाणे लोकसभेची जागा शिवसेनेकडे जाणार की, या जागेवर भाजप आपला दावा कायम ठेवणार? यावरून सस्पेन्स वाढला होता. पण अखेर ठाण्याचा बालेकिल्ला आणि कल्याणची सुभेदारी आपल्याकडे घेण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले आहे.

ठाण्यात शिवसेनेकडून माजी महापौर नरेश म्हस्के यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. या जागेसाठी आमदार प्रताप सरनाईक यांचेही नाव चर्चेत होते. तर दुसरीकडे या मतदारसंघासाठी भाजपही आशादायी होता. भाजपकडून इच्छुक असलेल्या माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी देखील त्यांचा प्रचार सुरू ठेवला असल्याने ठाणे लोकसभा मतदारसंघाचा सस्पेन्स वाढला होता.

दुसरीकडे शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे नाशिकचा सस्पेन्स अखेर संपला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या जागेवरुन महायुतीमध्ये घोळ सुरु होता.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande