सूरतमध्ये ७ हजारांपेक्षा जास्त उत्साही योगाभ्यास प्रेमींनी केला सराव
सूरत, 2 मे (हिं.स.) - आंतरराष्ट्रीय योग दिन - 2024 च्या पार्श्वभूमीवर गुजरातमधल्या सूरत इथे योग महोत

योगाभ्यास 

योगाभ्यास  

सूरत, 2 मे (हिं.स.) - आंतरराष्ट्रीय योग दिन - 2024 च्या पार्श्वभूमीवर गुजरातमधल्या सूरत इथे योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात सहभागी झालेल्या प्रत्येकाने योगाभ्यासाचा आनंद घेतला. आठवा लाईन्स इथल्या पोलिस कवायत मैदानावर या महोत्सवाचे आयोजन केले गेले. या महोत्सवासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या योग महोत्सवात सात हजारांपेक्षा जास्त उत्साही लोकांनी भाग घेतला. आज (गुरुवार) सकाळी 7 वाजता या महोत्सवाला सुरुवात झाली. महोत्सवाला सुरुवात झाल्यापासूनच सर्व सहभागींनी कॉमन योगा प्रोटोकॉल [Common Yoga Protocol (CYP)] अर्थात सामान्य योग अभ्यासाच्या सरावात स्वतःला झोकून दिले. या सहभागींनी दाखवलेला उत्साह आणि सक्रियतेमधून युवा वर्गाच्या वैयक्तिक तसेच सामाजिक पातळीवरील सुदृढतेमध्ये योगाभ्यासाचे वाढते महत्त्व अधोरेखित झाले.

या योग महोत्सवाला आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि आयुष मंत्रालयाचे उपमहासंचालक सत्यजित पॉल उपस्थित होते. यासोबतच नवी दिल्ली इथल्या इंटर युनिव्हर्सिटी एक्सीलरेटर सेंटरचे आणि आणि बंगळुरु इथल्या इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर योगिक सायन्सेसचे संचालक अविनाशचंद्र पांडे, मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे [Morarji Desai National Institute of Yoga (MDNIY)] संचालक वैद्य डॉ. काशिनाथ समगंडी हे देखील या महोत्सवाला उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या योग मोहत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व तर प्राप्त झालेच, पण त्यासोबतच त्यातून या मान्यवरांची योगाभ्यासाचा प्रचार तसेच व्यक्ती आणि समाजाच्या उन्नतीसाठीच्या बांधिलकीचे दर्शनही घडले. या मान्यवरांच्या सहभागामुळे परस्परसहभागाने योगाभ्यासाच्या माध्यमातून सर्वंकष कल्याणाला चालना देण्यासाठीची सामूहिक बांधिलकी अधोरेखित झाली.

सूरतने आपल्या देशाच्या विकासात आमूलाग्र योगदान दिले असल्याचे आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी आपल्या भाषणात नमूद केले. सूरतला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळाला ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचेही म्हणाले.

सूरतमधील शांततामय वातावरणात योग महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात आलेला जनसमुदाय पाहून आपल्याला आनंद वाटत असल्याची भावना वैद्य कोटेचा यांनी व्यक्त केली. या महोत्सवात सहभागी झालेल्यांनी, महोत्सव यशस्वी होण्यासाठी दाखवलेल्या शिस्तबद्धतेमुळे हा महोत्सव यशस्वी झाल्याचे म्हणत त्यांनी उपस्थितांचे कौतुक केले. योगाभ्यासाने आता जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे आणि 2023 सालच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमांमध्ये जगभरातील 23.5 कोटींहून अधिक लोकांनी योगाभ्यासाचा सराव केला होता असे त्यांनी नमूद केले. यंदाच्या वर्षी सहभागाचे हे प्रमाण वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 च्या 25 व्या काऊंटडाऊनच्या निमित्ताने बोधगया इथेही एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

2015 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केल्याने आपण एक महत्त्वाचा ऐतिहासिक टप्पा गाठला ही बाब त्यांनी अधोरेखित केली. योगाभ्यासाचा सराव केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने होणाऱ्या असंख्य लाभांबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी तसेच विविध संस्कृती आणि समाजांमध्ये योगाभ्यासाचा समावेश होऊन, त्याचा प्रत्यक्ष सराव होण्याला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणजे मोठे जागतिक व्यासपीठ ठरले असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. आंतरराष्ट्रीय योग दिनाला सुरुवात झाल्यापासून, योगाभ्यासाचा व्यक्ती तसेच समाजावर होणारा गहिरा प्रभाव अधोरेखित करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात विविध कार्यक्रम, चर्चासत्रे, कार्यशाळा आणि प्रात्यक्षिकांसह साजरा केला जात असल्याचे ते म्हणाले.

मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगाने हजारो कुशल योग मास्टर्सची निर्मिती करून आपल्या देशात योगासाठी पोषक वातावरण तयार करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे, असेही त्यांनी सांगितले.

मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा (एमडीएनआयवाय) चे संचालक डॉ. काशिनाथ समागंडी यांच्या स्वागतपर भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांनी सर्व सहभागींचे या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आणि अमूल्य योगदानाबद्दल आभार मानले. योगाच्या सार्वत्रिक सरावाला चालना देण्यासाठी त्याच्या महत्त्वावर जोर देऊन त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 (आयडीवाय-2024) च्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून योग महोत्सवाची भूमिका अधोरेखित केली. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उत्सवाची 10 वी आवृत्ती आरोग्य आणि कल्याण यांना प्रोत्साहन देणाऱ्या या जागतिक चळवळीच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे.

संस्थेच्या संचालकांच्या नेतृत्वात मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगामधील अभ्यासकांनी कौशल्य दाखवून सामान्य योगा प्रोटोकॉलचे थेट प्रात्यक्षिक सादर केले. 5000 हून अधिक योगप्रेमींनी या प्रात्यक्षिकांमध्ये सक्रियपणे भाग घेतला, एकत्रितपणे सामान्य योग प्रोटोकॉलमध्ये नमूद केलेल्या योग पद्धतींमध्ये सहभागी झाले.

आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, गुजरात योग मंडळ, राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि इतर अनेक मान्यवर आणि तज्ञांची या कार्यक्रमात उपस्थिती होती. याव्यतिरिक्त योग मास्टर्स आणि योग गुरूंच्या संदेशांनी मेळाव्याचे आणि या प्रसंगाचे महत्त्व आणखी स्पष्ट केले. वैयक्तिक आणि सामाजिक कल्याणासाठी योगाच्या महत्त्वावर जोर देऊन, त्यांच्या सामूहिक सहभागाने आणि मार्गदर्शनाने कार्यक्रमाची व्यापकता अधिक वाढली.

आयुष मंत्रालय आणि मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024. च्या निमित्ताने '100 दिवस, 100 शहरे आणि 100 संस्था' या मोहिमेचा भाग म्हणून सामूहिक योग प्रात्यक्षिके आणि सत्रांची मालिका आयोजित केली गेली आहे. हा उपक्रम शाळा, विद्यापीठे, संस्था, महाविद्यालये, कॉर्पोरेट संस्था, तसेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह विविध भागधारकांच्या सहकार्याने चालवला जातो.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande