सातवी संयुक्त संरक्षण सहकार्य समिती बैठक : भारत-इंडोनेशियाचे अधिकारी भूषवणार सह-अध्यक्षपद
नवी दिल्ली, 2 मे (हिं.स.) - भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सातवी संयुक्त संरक्षण सहकार्य समिती (जेडी
सातवी संयुक्त संरक्षण सहकार्य समिती बैठक : भारत-इंडोनेशियाचे अधिकारी भूषवणार सह-अध्यक्षपद


नवी दिल्ली, 2 मे (हिं.स.) - भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सातवी संयुक्त संरक्षण सहकार्य समिती (जेडीसीसी) बैठक 3 मे रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. या बैठकीचे सह-अध्यक्ष भारतीय संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे सरचिटणीस निवृत्त एअर मार्शल डॉनी एरमावान तौफंटो असतील. दोन्ही बाजूने सामायिक हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय केला जाणार आहे.

2018 मध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर भारत-इंडोनेशिया मैत्री प्रस्थापित झाली होती.त्यामुळे संरक्षण उद्योग,विज्ञान आणि तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात नवीन सहकार्याला अनुमती देण्यासाठी द्विपक्षीय संबंधांची व्याप्ती वाढली आहे. या वाढत्या भागीदारीसाठी संरक्षण संबंध महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

सेवांमधील विस्तृत संपर्क, लष्करी देवाणघेवाण, उच्च-स्तरीय भेटी, क्षमता निर्माण आणि प्रशिक्षण कार्यक्रम, संयुक्त राष्ट्र शांतता रक्षणातील सहकार्य, जहाजांच्या भेटी आणि द्विपक्षीय सराव यांचा समावेश केल्यामुळे दोन्ही राष्ट्रांमधील संरक्षण प्रतिबद्धता वैविध्यपूर्ण झाली आहे.

भारत आणि इंडोनेशिया यांच्यात 2001 मध्ये स्वाक्षरी करण्यात आलेल्या संरक्षण सहकार्य करारामध्ये जेडीसीसी ची स्थापना करून सहकार्याची संभाव्य क्षेत्रे, समान हिताच्या बाबी, मान्यताप्राप्त सहकारी उपक्रम सुरू करणे, समन्वय करणे, देखरेख करणे आणि नियंत्रित करणे या गोष्टींचा समावेश आहे.

2 ते 4 मे या कालावधीत भारत दौऱ्यावर असणारे सरचिटणीस नवी दिल्ली आणि पुणे येथील भारतीय संरक्षण उद्योगांशी संबंधितांबरोबर देखील चर्चा करतील.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande