स्वयंसेवकांनी प्रामाणिकपणे केले मतदान- संघ
अफवेमुळे घसरला मतदानाचा टक्का नागपूर, 02 मे (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांसाठी
संग्रहित


अफवेमुळे घसरला मतदानाचा टक्का

नागपूर, 02 मे (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांसाठी सरसंघचालकांची सूचना ही आदेश असते. त्यामुळे स्वयंसेवकांनी निवडणुकीत प्रामाणिकपणे मतदान केले. तेव्हा सोशल मिडीया आणि समाजात सुरू असलेल्या चर्चा निव्वळ अफवा असल्याची माहिती संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून समाजात आणि सोशल मिडीयावर मतदानासांदर्भात चर्चा घडवून आणली जातेय. त्यात सरकार विरोधात ऍन्टी-इन्कबन्सी आहे आणि स्वयंसेवक भाजपपासून दुरावल्याचे लोकांच्या मनावर बिंबवले जातेय. विदर्भात लोकसभेच्या 10 जागा असून पूर्व विदर्भात 19 एप्रिल आणि पश्चिम विदर्भात 26 तारखेला मतदान झाले. गेल्या वेळच्या तुलनेत यंदा मतदान कमी झाले. त्यामुळे संघाने भाजपकडे पाठफिरवली अशा चर्चांना उधाण आलेय. तसेच यंदा भाजपला बहुमत मिळणार नाही आणि मोदी पंतप्रधान बनणार नाहीत अशी चर्चा देखील घडवून आणली जातेय. परंतु, या सर्व चर्चा तथ्यहिन असल्याचे संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यासंदर्भात तपशीलवार माहिती देताना संघ पदाधिकारी म्हणाले की, निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर नागपुरात जनार्दन मून नामक इसमाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असा बॅनर लावून पत्रकार परिषद घेतली. तसेच मोदींना सत्तेतून बाहेर घालवण्यासाठी संघ आवाहन करीत असल्याचे त्याने सांगितले. मून यांची ही पत्रकार परिषद काही छोटी-मोठी चॅनल्स आणि युट्यूबवरून व्हायरल झाली. वास्तविक पाहता जनार्दन मून यांचा संघाशी सुतराम संबंध नाही. त्यांनी संघाचे नाव वापरले म्हणून संघातर्फे मूनच्या विरोधात निवडणूक आयोग आणि पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलीय. मतदान सुरू असलेल्या भागांमध्ये हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. हा खोटा व्हिडीओ पाहून अनेक लोकांना असे वाटले की, यंदा भाजपला संघाचे समर्थन नाही. परंतु, खरे स्वयंसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रामाणिकपणे मतदानाचा हक्क बजावल्याचे त्यांनी सांगितले.

यंदाच्या निवडणुकीत उन्हाचा तडाखा, भाजप संविधान बदलेल ही अफवा आणि मतदार याद्यांमधील घोळ यामुळे एकंदरीत मतदानाचा टक्का घसरला. परंतु, दुसऱ्या बाजुला मुस्लीम आणि मागासवर्गीय यांच्या मतदानात वाढ झाल्याचे दिसून आले. ही मते भाजप विरोधातील उमेदवाराला पडलीत अशी चर्चा आहे. त्यामुळे यंदा भाजपच्या अनेक जागा कमी होतील असे बोलले जाते. यासंदर्भात संघ पदाधिकारी म्हणाले की, सर्वप्रथम मुस्लीम, मागासरवर्गीय अशी मतदारांची वर्गवारी करणे बंद केले पाहिजे. मतदार हा मतदार असते आणि प्रत्येक मताचा समान आदर राखला पाहिजे. फक्त अफवेमुळे कुणाच्या समर्थनात किंवा विरोधात एकगठ्ठा मतदान होणे हे लोकशाहीला पोषक नाही हे सर्वांनी समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आगामी मतदानाच्या टप्प्यांमध्ये नागरिकांनी उस्फूर्तपणे मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande