सोलापूर जिल्ह्यातील 3,617 मतदान केंद्रावर स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ
सोलापूर, 2 मे (हिं.स.)भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा
केंद्रावर स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ


सोलापूर, 2 मे (हिं.स.)भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील 3 हजार 617 मतदान केंद्रावर स्वच्छता मोहीम राबवून त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ग्रामीण भागातील 2 हजार 361 मतदान केंद्रापैकी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मतदान केंद्राच्या परिसरात स्वतः झाडू हाती घेऊन केंद्र परिसरात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला. नगरपालिका स्तरावरील 484 मतदान केंद्रावर ही आजपासून स्वच्छता मोहीम सुरू झाली असून महापालिका स्तरावरील 772 केंद्रावर स्वच्छता मोहीम लवकरच सुरू होत आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, दक्षिण सोलापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री. वाघ यांच्यासह बोरामणी येथील ग्राम स्तरीय कर्मचारी उपस्थित होते.

मागील लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात सरासरी मतदान जवळपास 61 टक्के इतके झालेले आहे ते यावर्षी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये किमान 70 टक्के पेक्षा अधिक मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदारांसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील वाढते तापमान पाहता सावलीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मंडप उभारण्यात येणार आहे, त्यामुळे मतदारांना उन्हाचा त्रास होणार नाही. तसेच मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याबरोबरच ओआरएस चे पाणीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान केंद्र परिसराची स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आलेली असून प्रत्येक मतदान केंद्र व परिसर अत्यंत स्वच्छ ठेवण्यात येणार आहे. ही मोहीम 6 मे 2024 पर्यंत राबविण्यात येत आहे. मतदान केंद्र व परिसरात स्वच्छता राहिल्याने मतदारांना मतदान करण्यासाठी उत्साह राहील. मतदान केंद्रावर मोठ्या रांगा लागल्यास मतदारांना बसता यावे यासाठी तेथे बेंचेस व खुर्चींची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande