कोपरीत इमारतीच्या छताचे प्लास्टर पडुन एक जखमी
ठाणे, २ मे, (हिं.स) ठाणे पूर्वेकडील कोपरी गावदेवी मंदिर परीसरातील ४० ते ५० वर्षे जुन्या शारदा भवन या
कोपरीत इमारतीच्या छताचे प्लास्टर पडुन एक जखमी


ठाणे, २ मे, (हिं.स) ठाणे पूर्वेकडील कोपरी गावदेवी मंदिर परीसरातील ४० ते ५० वर्षे जुन्या शारदा भवन या तळ अधिक तीन मजली इमारतीतील पहिल्या मजल्यावरील सदनिकेचे प्लास्टर कोसळुन एक तरूण जखमी झाल्याची घटना मध्यरात्री घडली. शैलेश शर्मा आणि बंधुंच्या मालकीची असलेल्या या इमारतीत एकुण २२ सदनिका असुन स्ट्रक्चरल ऑडिट नंतरच इमारतीवरील कारवाई बाबत निर्णय घेतला जाईल. अशी माहिती घटनास्थळी भेट दिलेल्या ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, इमारतीच्या मालकांकडून इमारतीच्या दुरुस्तीबाबत अक्षम्य हेळसांड केली जात असल्याचा आरोप येथील सदनिकाधारकांनी केला.

कोपरीतील गावदेवी मंदिरासमोरील चिंचोळ्या गल्लीत शारदा भवन ही ४० ते ५० वर्ष जुनी तळ अधिक तीन मजली इमारत आहे. मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास

पहिल्या मजल्यावरील रूम नं.३ या श्रीमती सरोजिनी मुर्तुडकर यांच्या सदनिकेतील छताचे प्लास्टर कोसळले. यात अनिकेत मुर्तुडकर (२१) यांच्या पायाला किरकोळ जखम झाली. इमारतीमध्ये एकूण २२ सदनिका असून त्यातील १० ते १२ सदनिकांमध्ये प्लास्टरला व कॉलमला तडे गेल्याने रहिवाशी धास्तावले आहेत, सद्यस्थितीत रूम नं. ०३ मधील राहणाऱ्या तीनही रहिवाश्यांना बाहेर काढण्यात आले असून तात्पुरत्या स्वरुपात त्यांना दुसऱ्या ठिकाणी राहण्यास सांगितले आहे. घटनास्थळी ठाणे मनपाच्या बांधकाम विभागाचे उपनगर अभियंता व उप अभियंता, अग्निशमन दलाचे जवान, इमर्जन्सी टेंडर, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.तसेच, इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश इमारत मालक व रहिवाश्यांना दिले. स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानंतर इमारतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. यावेळी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी कृष्णा भुजबळ उपस्थित होते.

दरम्यान, शारदा भवन इमारतीचे मालक शर्मा बंधु यांच्याकडून सदनिकांच्या दुरुस्ती आणि डागडुजीबाबत नेहमीच अडवणुक केली जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे, धास्तावलेल्या रहिवाश्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्याचे सांगितले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande