ठाणे - स्वीप पथकाने शाळांमध्ये केली मतदानाची जनजागृती
ठाणे,२ मे, (हिं.स) : ‘मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून सर्वानी मतदान करा’ असा संदेश 147 कोप
ठाणे - स्वीप पथकाने शाळांमध्ये केली मतदानाची जनजागृती


ठाणे,२ मे, (हिं.स) : ‘मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून सर्वानी मतदान करा’ असा संदेश 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात आला. दि.२९ व ३० एप्रिल या दोन तारखांना सर्व शाळांचे वार्षिक निकाल जाहीर होतात, हीच संधी साधत स्वीपच्या टिमने कोपरी पाचपाखाडीमधील सर्व शाळांमध्ये मतदानाबाबत जनजागृती केली. या मतदान जनजागृतीस पालकांचा तसेच शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शाळेचा निकाल हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस असतो, या दिवशी आपल्या पाल्याचा निकाल घेण्यासाठी प्रत्येक पालक हे शाळेत येत असतात, किंबहुना घरातील प्रत्येक व्यक्ती निकालपत्र पाहत असतात, याचाच फायदा घेत स्वीपच्या टिमने ‘मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, मतदान करा’ असा शिक्का बनविला व त्याचे ठसे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या निकालपत्रावर उमटवित अनोख्या पध्दतीने मतदानाची जनजागृती केली. कोपरी पाचपाखाडी परिसरातील महापालिकेच्या शाळांसह खाजगी शाळांमध्ये देखील अशा पध्दतीने मतदान जनजागृती स्वीपच्या पथकाने केली.

‘मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो’, आपले मत हा लोकशाहीचा खरा आधार असा संदेश देणारे फलक विद्यार्थ्यानी हातात घेवून शाळेत निकाल घेण्यासाठी येणाऱ्या पालकांमध्ये जनजागृती केली तसेच स्वीपच्या टिमने प्रत्येक वर्गात जावून मतदान करण्याचा संदेश पालकांना दिला. अठरावं वरीस मोक्याचं.. अशी जनजागृती शालेय विद्यार्थ्यांनी करुन आपल्या मोठया भावंडांना देखील मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

याप्रसंगी स्विप टिमचे गटप्रमुख श्री.राजेन्द्र परदेशी सर , श्री.अनंत सोनावळे, श्री.अरविंद सावंत, श्री.सिताराम परब, श्री.रोहित चेटोले, श्री.नैनेश भालेराव या सहकारी यांनी शाळेत उपस्थित राहून पालकांना मतदान करण्याचे आवाहन केले शिक्षक पालक यांनी प्रतिसाद चांगला दिला.

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत नागरिकांनी मतदान करावे, यासाठी संपूर्ण शहरात स्वीपअंतर्गत मतदानाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande