भंडारा कारागृहात भिंतीमध्ये छिद्र करून लपविल्या मोबाइलच्या बॅट-या
भंडारा, ४ मे, (हिं.स) : भंडारा येथील जिल्हा कारागृहात मकोकाच्या आरोपाखाली बंदिस्त असलेल्या एका कैद्य
भंडारा कारागृहात भिंतीमध्ये छिद्र करून लपविल्या मोबाइलच्या बॅट-या


भंडारा, ४ मे, (हिं.स) : भंडारा येथील जिल्हा कारागृहात मकोकाच्या आरोपाखाली बंदिस्त असलेल्या एका कैद्याने आपल्या बराकीलगतच्या शौचालयातील भिंतीमध्ये छिद्र करून मोबाइलच्या चार बॅटरी लपविल्याचे प्रकरण पुढे आले आहे. एवढेच नाही, तर त्याच्या बराकीसमोरील जागेतून चालू स्थितीतील एक मोबाइलही जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. जुल्फेकार ऊर्फ छोटू जब्बार गनी (४०) असे या आरोपीचे नाव असून तो गोंदियातील रहिवासी आहे. याप्रकरणी त्याच्याविरूद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१ मे च्या रात्री कारागृह अधीक्षक देवराव आदे यांच्या आदेशावरून कैद्यांच्या बॅरेकची आकस्मिक तपासणी सुरू करण्यात आली होती. ही तपासणी सुरू असतानाच एका बॅरेकमधून बाहेर काही वस्तू फेकल्याचे तपास कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे रात्री कसून तपासणी केली असता त्याच्या बॅरेकलगतच्या शौचालयात छिद्र करून भिंतीत लपविलेल्या मोबाइलच्या चार बॅट-या आढळल्या.

दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळच्या दरम्यान कारागृह कर्मचाऱ्यांनी त्याच्या बॅरेकलगतच्या जागेची तपासणी केली असता चालू स्थितीतील मोबाइल निळ्या रंगाच्या पट्टीमध्ये गुंडाळलेल्या स्थितीत बेवारस पडलेल्या स्थितीत आढळला. सर्व बॅटऱ्या व मोबाइल जप्त करण्यात आले असुन आरोपी विरुध्द शहर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र कारागृहात मोबाइल, बॅटरी, चुना आला कसा हा आता संशोधनाचा विषय आहे. त्याच्या या कृत्यात कोणी सहभागी आहेत का, यामागील त्याचा हेतू काय होता, मोबाइलचा वापर त्याने केला का, केला असल्यास तो कोणाशी संभाषण करत होता, याचा शोध लावण्याची गरज आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande