कर्नाटक : एचडी रेवन्ना यांना एसआयटीकडून अटक
बेंगळुरू, 04 मे (हिं.स.) : कर्नाटकातील पेन ड्राइव्ह घोटाळ्यात अडकलेले जेडीएसचे खासदार प्रज्ज्वल रेवन
एचडी रेवन्ना


बेंगळुरू, 04 मे (हिं.स.) : कर्नाटकातील पेन ड्राइव्ह घोटाळ्यात अडकलेले जेडीएसचे खासदार प्रज्ज्वल रेवन्ना यांचे वडील एचडी रेवन्ना यांना एसआयटीने ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर म्हैसूरमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना ताब्यात घेतल्याच्या काही मिनिटांनंतर न्यायालयाने या प्रकरणातील त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला.

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा मुलगा एचडी रेवन्ना आणि त्यांचा विश्वासू सतीश बबन्ना यांच्याविरुद्ध म्हैसूरमध्ये एका महिलेचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार पुत्र प्रज्वल रेवन्ना याने आपल्या आईचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपही मुलाने केला आहे. याप्रकरणी बबन्ना याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. प्रज्वलच्या विरोधात साक्ष देऊ नये म्हणून महिलेचे अपहरण करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.

या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी रेवन्ना यांनी विशेष न्यायालयात धाव घेतली. परंतु, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. जामीन अर्ज स्वीकारल्यास तो एसआयटीच्या चौकशीत सहभागी होतील असे आश्वासन रेवन्नाच्या वकिलांनी न्यायालयाला दिले. दुसरीकडे, एसआयटीच्या वकिलाकडून जामीन अर्जावर आक्षेप घेण्यात आला. शनिवारी पोलीस अधिकाऱ्यांनी म्हैसूर जिल्ह्यातील कालेनाहल्ली गावात शोध घेतला तेव्हा अपहृत महिला एका फार्महाऊसमध्ये सापडली. हे फार्महाऊस रेवन्नाच्या एका सहकाऱ्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सांगितले होते की, प्रज्ज्वल यांच्याविरोधात सीबीआय ब्लू कॉर्नर नोटीस जारी करू शकते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एसआयटी अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली होती, त्यादरम्यान त्यांनी प्रज्ज्वल रेवन्नाला अटक करण्यासाठी तातडीने कारवाई करण्यास सांगितले होते. बैठकीत एसआयटी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, रेवन्नाला अटक करण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील. प्रज्ज्वल विमानतळावर पोहोचल्याची माहिती मिळताच त्याला तत्काळ अटक करण्यात येईल, असे एसआयटीने म्हटले आहे. या प्रकरणी प्रज्वल रेवन्ना विरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती एसआयटीने सीबीआयला केली आहे. प्रज्वलच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर त्याच्या ठावठिकाणाबाबत माहिती मिळू शकेल, अशी आशा तपास पथकाने व्यक्त केली.

कर्नाटकातील पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर 27 एप्रिल रोजी प्रज्ज्वल रेवन्ना परदेशात गेल्याचे वृत्त आहे. त्याच्या वकिलाने एसआयटीसमोर हजर राहण्यासाठी 7 दिवसांचा अवधी मागितला होता, ज्याला तपास पथकाने हे शक्य नसल्याचे उत्तर दिले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रज्ज्वलला अटक करण्यासाठी एसआयटीला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande