नागरिकांनी मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा - ठाणे आयुक्त
ठाणे, 5 मे (हिं.स.) लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी नागरिकांनीही सक्रिय पुढाकार घ्याव
नागरिकांनी मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा - ठाणे आयुक्त


ठाणे, 5 मे (हिं.स.) लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी नागरिकांनीही सक्रिय पुढाकार घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांनी यात मोलाची भूमिका बजावावी असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे.

उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात राबविलेल्या सर्वंकष स्वच्छता अभियानात, आंबेघोसाळे तलाव येथे मतदानाची जनजागृती करणारे फलक लावून नागरिकांना मतदानाचे आवाहन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, मनीष जोशी, जी. जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, अनघा कदम, सचिन पवार, सहायक आयुक्त महेश आहेर आदी उपस्थित होते. रोटरी क्लब, शिवशांती प्रतिष्ठान, ज्येष्ठ नागरिक संघ यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून येत्या २० मे २०२४ ही तारीख लक्षात ठेवून सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा. जोडून आलेल्या सुटीच्या मोहात न पडता मतदानाच्या कर्तव्याला प्राथमिकता द्यावी, असेही आवाहन आयुक्त राव यांनी केले.

जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभागी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मिडिया, आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रमातंर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेने मतदान यंत्रांची प्रतिकृती असलेला मॅस्कॉटही तयार केलेला आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande