कोलशेत-ढोकाळी येथील सामाजिक संस्थांकडून आ.केळकर यांचा जाहीर सत्कार
ठाणे, 5 मे (हिं.स.) जनतेसाठी करीत असलेले काम हे श्रेयासाठी नसून कर्तव्य आणि सामाजिक बांधिलकीच्या नात
कोलशेत-ढोकाळी येथील सामाजिक संस्थांकडून आमदार संजय केळकर यांचा जाहीर सत्कार


ठाणे, 5 मे (हिं.स.) जनतेसाठी करीत असलेले काम हे श्रेयासाठी नसून कर्तव्य आणि सामाजिक बांधिलकीच्या नात्याने करतो, असे उद्गार ठाणे शहर मतदारसंघाचे आमदार संजय केळकर यांनी काढले.

कोलशेत-ढोकाळी परिसरात विविध नागरी कामे आणि समस्यांचे निर्मूलन केल्याबद्दल या परिसरातील दहा सामाजिक संस्थांनी लोढा अमाराच्या परिसरात आमदार संजय केळकर यांचा भव्य जाहीर सत्कार सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री.केळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ठाणे मतदारसंघात विकासाची कामे करताना, नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवताना मी कधीही कुणाचा पक्ष पाहिला नाही. निरपेक्ष भावनेने जनतेची कामे करत आलो आहे. जनतेची कामे करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. सामाजिक बांधिलकीतून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतो, त्यामुळे श्रेय घेण्याचा विचार माझ्या मनाला कधीच शिवला नाही. सेवा भाव हा माझा स्थायी स्वभाव असल्याचे स्पष्ट मत श्री.केळकर यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. लोकसहभाग, लोक चळवळ आणि लोक कल्याण या त्रिसूत्रीवर आपण कार्य करत असल्याचेही ते म्हणाले.

जैन प्रकोष्ठचे राकेश जैन यांनी पुढाकार घेऊन या सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी शेकडो रहिवाशांनी उपस्थित राहून श्री.केळकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पाणी, रस्ते, वाहतूक, महानगर गॅस जोडणी, नाले सुरक्षा आणि सफाई, कायदा सुव्यवस्था आदीबाबत आमदार संजय केळकर यांनी नागरिकांना सहकार्य केल्याचे प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.

यावेळी कोलशेत ढोकाळी परिसरातील गृहसंकुलातील पदाधिकारी, रहिवासी यांच्यासह ॲड. हेमंत म्हात्रे, नीलेश पाटील, सचिन शिंगारे, दत्ता घाडगे, रवी रेड्डी, मत्स्यगंधा पवार आदी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande