ॲड. निकम यांच्याविरुद्ध खोटे आरोप, वडेट्टीवारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या!
* भाजपाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी मुंबई, ६ मे (हिं.स.) : “26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झाल
ॲड. निकम यांच्याविरुद्ध खोटे आरोप, वडेट्टीवारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या!


* भाजपाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई, ६ मे (हिं.स.) : “26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर रा. स्व. संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले,” असा निखालस खोटा आरोप केल्याबद्दल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे कायदा विभागाचे संयोजक ॲड.अखिलेश चौबे यांनीही मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात वडेट्टीवार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

भारतीय जनता पार्टीने दिल्ली येथे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,विधानसभेतील विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या हल्ल्यासंदर्भात ॲड.उज्ज्वल निकम यांच्या विरोधात अत्यंत खोटे, बदनामीकारक आरोप केले आहेत. त्या हल्ल्यात दहशतवाद्यांविरोधात आपल्या प्राणाची पर्वा न करता लढणाऱ्या असंख्य योद्ध्यांच्या बलिदानाचीही वडेट्टीवार यांनी क्रूर थट्टा केली आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांमुळे ॲड.उज्ज्वल निकम यांची बदनामी झाली आहे. त्याच बरोबर निवडणूक आचारसंहितेचेही उल्लंघन झाले आहे. वडेट्टीवार यांच्या विधानाबाबत काँग्रेस पक्षाकडून अद्याप कसलीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. याचा अर्थ काँग्रेस पक्षाची वडेट्टीवार यांच्या आरोपांना संमती आहे,असे दिसते. वडेट्टीवार यांच्या विधानांमुळे भारतीय दंड संहितेतील देशद्रोहासंदर्भातील कलम 124 अ आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951 कलम 123 (4) चे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांना बिनशर्त माफी मागण्याचे आदेश द्यावेत, श्री .वडेट्टीवार आणि काँग्रेस पक्षाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात यावेत, निवडणुकीच्या उर्वरीत कालावधीत वडेट्टीवार यांना प्रचार करण्यास बंदी करावी आदी मागण्याही भारतीय जनता पार्टीतर्फे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत.

भाजपा प्रदेश कायदा विभागाचे संयोजक ॲड. अखिलेश चौबे यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात वडेट्टीवार यांच्याविरुद्ध धार्मिक वैमनस्य निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande