शहर नामांतराला विरोध करणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे काय करत आहेत? - अमित शाह
जालना, 8 मे (हिं.स.) - औरंगाबाद जिल्ह्याचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचे काम आमच्या सरकारने केले
अमित शाह


जालना, 8 मे (हिं.स.) - औरंगाबाद जिल्ह्याचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर दिले होते. मात्र या निर्णयाला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्या पायापाशी उद्धव ठाकरे काय करत आहेत?, असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थित केला आहे. माझ्या सभेनंतर दोनच दिवसांनी उद्धव ठाकरे देखील जालन्यात सभा घेणार आहेत. त्यावेळी त्यांना हा प्रश्न विचारा, असेही शाह म्हणाले.

जालना लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. एकीकडे देशात उष्णता वाढताच बँकॉक आणि थायलंडला जाणारे राहुल गांधी आहेत, तर दुसरीकडे गेल्या २३ वर्षापासून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून देशाची सेवा करताना एक दिवसाची देखील सुट्टी न घेणारे नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे आता जनतेला कोणाला निवडायचे याचा निर्णय घ्यायचा आहे, असे आवाहनही त्यांनी जालनावासियांना केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाला समृद्ध आणि संपन्न केले आहे. जगभरात देशाचे नाव मोठे करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. अयोध्यामध्ये राम मंदिर बनवण्याचा काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मात्र शरद पवार आणि कंपनीने अनेक वर्षांपासून राम मंदिराचा मुद्दा थांबवून ठेवला होता, असा आरोप शाह यांनी केला. केवळ पाचच वर्षात नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचा खटला जिंकला, मंदिराचे भूमिपूजन केले आणि आता प्राणप्रतिष्ठा देखील केली. इतकेच नाही तर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण इंडी आघाडीला देण्यात आले होते. मात्र, वेगवेगळी कारणे सांगत सर्व नेत्यांनी या कार्यक्रमाला जाणे टाळले. त्यांनी त्यांच्या व्होट बँकेसाठी या कार्यक्रमाला उपस्थिती टाळली असल्याचेही शाह यांनी म्हटले आहे.

जालन्याचे स्टील आता जगभरात जाणार

जालना शहर हे स्टील उद्योगाचे केंद्र आहे. जालना शहरातील स्टील हे पूर्ण देशभरात जाते. मात्र आता येथे मोदी सरकार पोर्ट तयार करत असून देशातच नाही तर जगभरात जालन्याचे स्टील जाण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. हे काम देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे शक्य झाले असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.

जालना लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी रावसाहेब दानवे यांना पाच वेळा निवडून दिले आहे. आता पुन्हा सहाव्यांदा त्यांना तुम्ही खासदार म्हणून दिल्लीत पाठवा. ते खूप मोठे व्यक्ती बनतील, असा माझा तुम्हाला शब्द आहे. रावसाहेब दानवे सहाव्या लोकसभेत आले तर जालना लोकसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा दावा शाह यांनी केला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande