लाचखोरी प्रकरणी सीबीआयकडून 9 जणांना अटक
दिल्लीच्या राममनोहर लोहिया रुग्णालयात कारवाई नवी दिल्ली, 08 मे (हिं.स.) : दिल्लीच्या राममनोहर लोहि
संग्रहित


दिल्लीच्या राममनोहर लोहिया रुग्णालयात कारवाई

नवी दिल्ली, 08 मे (हिं.स.) : दिल्लीच्या राममनोहर लोहिया हॉस्पिटल मधील (आरएमएल) रॅकेटचा सीबीआयने भंडाफोड केला आहे. लाचखोरी प्रकरणी 2 डॉक्टरांसह 9 जणांना अटक केली आहे. यांच्यावर उपचाराच्या नावाखाली रुग्णांकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे.

सीबीआयला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राममनोहर लोहिया रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांकडून उपचाराच्या नावाखाली पैसे वसुल केले जात होते. यामध्ये वैद्यकीय उपकरणे पुरवण्याचे काम करणाऱ्या लोकांचाही समावेश आहे. हे लोक संपूर्ण रॅकेट चालवायचे अशी माहिती देखील सीबीआयला मिळाली होती. त्या आधारे सीबीआयने कारवाई करत याप्रकरणी 9 जणांना अटक केली आहे. अहवालानुसार, आरोपी 5 मॉड्यूलद्वारे भ्रष्टाचार करत होते. रुग्णांच्या उपचारासाठी ते मोठ्या प्रमाणात शुल्क आकारत होते. स्टेंट आणि इतर वैद्यकीय गरजा, विशिष्ट ब्रँडच्या स्टेंटचा पुरवठा आणि लॅबमध्ये वैद्यकीय उपकरणे यासाठी रुग्णांकडून लाच घेतली जाते. बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याच्या नावाखाली रुग्णालयात वसुली केली जात होती.

नवी दिल्ली येथील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील अनेक डॉक्टर आणि कर्मचारी भ्रष्टाचारात गुंतल्याचे सांगण्यात आले. विविध प्रकारची वैद्यकीय उपकरणे पुरविणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींमार्फत रुग्णांकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लाच घेतली जात आहे. रुग्णालयातील 2 डॉक्टर उघडपणे लाचेची मागणी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अत्यावश्यक उपकरणांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींमार्फत हे लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे रुग्णांकडून लाच घेत होते. नागपाल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे मालक नरेश नागपाल रुग्णालयांना उपकरणे पुरवतात. गेल्या 2 मे रोजी डॉक्टरांनी उपकरणे पुरवण्याच्या बदल्यात नागपाल यांच्याकडे लाच मागितली. नरेश नागपाल यांनी मागितलेल्या लाचेची थकीत रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande