ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदांचा राजीनामा
नवी दिल्ली, 08 मे (हिं.स.) : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राज
सॅम पित्रोदा


नवी दिल्ली, 08 मे (हिं.स.) : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केलाय. सॅम पित्रोदा यांनी भारतीयांबद्दल केलेल्या वर्णद्वेषी टिप्पणीनंतर भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली होती.

इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा वारंवार वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर पित्रोदा यांनी वारसा करारावर विधान केले होते. त्यावरून भाजपने काँग्रेसला निवडणूक प्रचारात चांगलेच धारेवर धरले. तर आता पित्रोदा यांनी भारतीय लोकांवर वादग्रस्त व वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप आहे. एका व्हिडीओत पित्रोदा म्हणाले की, पूर्वोत्तर भारतातील लोक चिनी आणि दक्षिण भारतीय आफ्रिकन लोकांसारखे दिसतात. यावरून भाजपने पुन्हा पित्रोदांवर जोरदार टीकास्त्र सोडले. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा, भाजप प्रवक्ता शहजाद पुनावाला आणि रवीशंकर प्रसाद यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील वारंगल इथल्या सभेत पित्रोदांच्या विधानावरून जोरदार टीका केली. देशवासियांचा अपमान सहन करणार नसल्याचे मोदी म्हणाले. तर काँग्रेसने सोईस्करपणे पित्रोदांच्या विधानापासून अंतर राखल्याचे दिसून आले. दिवसभर या विषयावरून झालेल्या टीकेनंतर सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यासंदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवर सांगितले की, पित्रोदांनी राजीनामा दिला असून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी त्यांचा राजीनामा स्वीकारलाय.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande