उष्माघात वार्डाची पाहणी न करता अमरावती विभागीय आयुक्त परतल्या
रुग्णालयाचा वीजपुरवठा वारंवार खंडित अमरावती, 8 मे (हिं.स.) जिल्ह्याचे तापमान 44 अंश सेल्सिअसवर पोहच
उष्माघात वार्डाची पाहणी न करता अमरावती विभागीय आयुक्त परतल्या


रुग्णालयाचा वीजपुरवठा वारंवार खंडित

अमरावती, 8 मे (हिं.स.) जिल्ह्याचे तापमान 44 अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. त्यामुळे उष्णघातामुळे कोणाचाही मृत्यू होऊ नये यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन उष्णघात वार्ड तयार करण्यात आले आहे. या उष्मघात वार्डाची पाहणी करण्याकरिता विभागीय आयुक्त निधी पांडेय या जिल्हा सामान्य रुग्णालयात आल्या असता नेमका त्याच वेळेसच रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित झाला. उन्हाळ्याच्या काळात भीषण गर्मी असल्याने रुग्णांना फॅन, कुलरची आवश्यकता असते. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रुग्णालयात पाहणी करण्याकरिता आलेल्या विभागीय आयुक्तांना उष्माघात वार्डाची पाहणी न करताच बाहेर जावे लागले. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मोबाईलचा टॉर्च लावून रुग्णालयातून बाहेर काढले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौन्दळे यांना रुग्णालयातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठाचे कारण विचारले असता त्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाचा वीज पुरवठा एकाच लाईनवर असून जिल्हा स्त्री रुग्णालयात काम सुरू असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे सांगितले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande