रत्नागिरीतील खून प्रकरणी संशयिताचे रक्ताळलेले कपडे ताब्यात
रत्नागिरी, 8 मे, (हिं. स.) : येथील गवळीवाडा येथे वॉचमनच्या खून प्रकरणात संशयित आरोपी वेदांत आखाडे या
रत्नागिरीतील खून प्रकरणी संशयिताचे रक्ताळलेले कपडे ताब्यात


रत्नागिरी, 8 मे, (हिं. स.) : येथील गवळीवाडा येथे वॉचमनच्या खून प्रकरणात संशयित आरोपी वेदांत आखाडे याचे रक्ताने माखलेले कपडे पोलिसांनी हस्तगत केले आहेत . वॉचमनचा लाकडी दांडक्याने वार करून खून करताना रक्ताच्या चिळकांड्या वेदांत याच्या कपड्यांवर उडाल्या होत्या. रक्ताचे डाग असलेले हे कपडे पोलिसांकडून प्रयोगशाळेत नमुना तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

तपासाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो असे मानले जात आहे. अशोक महादेव वाडेकर (७०, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहे. अशोक हे घरापासून जवळच असलेल्या श्री गणेश रेसिडेन्सी इमारतीमध्ये वॉचमन म्हणून काम करत होते. याच इमारतीमध्ये संशयित आरोपी वेदांत चंद्रकांत आखाडे राहतो. संशयित आरोपी वेदांत याने गच्चीची चावी मिळावी म्हणून वॉचमन वाडेकर याच्याकडे तगादा लावला होता. मात्र वाडेकर चावी देत नसल्याने यातून दोघांमध्ये वाद होत होता. त्या रागातून २७ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी वेदांत याने लाकडी दांडक्याने वार करून अशोक वाडेकर यांचा खून केला, असा आरोप वेदांत याच्यावर ठेवण्यात आला आहे.

वेदांतने अशोक यांचा खून केल्यानंतर लाकडी दांडका घटनास्थळापासून जवळच असलेल्या झुडपात लपवून ठेवला होता. तसेच आपल्या अंगावरील रक्ताचे डाग साफ करण्यासाठी तातडीने तो घरी आला आणि अंगावरील रक्ताचे डाग धुतले. तसेच कपडे घरीच काढून ठेवले होते.

खुनाची घटना उघड झाल्यानंतर पोलिसांकडून मारेकऱ्याचा शोध घेण्यात येत होता. अशोक वाडेकर व वेदांत यांच्यातील यापूर्वीचा वाद व वेदांत यांची पार्श्वभूमी लक्षात घेता पोलिसांचा संशय बळावला. त्या दृष्टीने तपास करून त्यांनी वेदांतला अटक केली. आता पुढील तपास सुरू आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande