ठाणे जिल्ह्यातील पशुधनास 1 जूनपासून ईअर टॅगिंग बंधनकारक - अशोक शिनगारे
ठाणे, 8 मे (हिं.स.) प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ च्या प्र
ठाणे जिल्ह्यातील पशुधनास 1 जूनपासून ईअर टॅगिंग बंधनकारक - अशोक शिनगारे


ठाणे, 8 मे (हिं.स.) प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टंगिंग (पशुधनाच्या कामात बिल्ला लावणे) करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. इअर टॅगिंग नसलेल्या पशुधनासंदर्भात कोणत्याही सेवा देण्यात येणार नाहीत. त्यामुळे सर्व संबंधितांनी आपल्या पशुधनाचे इअर टॅगिंग करून त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा तथा प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ चे सक्षम प्राधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने नॅशनलमं डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमध्ये Ear tagging (१२ अंकी चार कोड) च्या नोंदी घेण्यात येत आहेत. यामध्ये जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण यांचा समावेश आहे. प्रणालीवर संबंधीत पशुधनाची प्रजनन, आरोग्य, मालकी हक्क, जन्म-मृत्यु इ. सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सर्व पशुधनास कानात टॅग (बिल्ला) लावून त्याची भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकिय संस्थामार्फत पशुधनास कानात टॅग (बिल्ला) लावून त्याची भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी प्रक्रिया सुरु आहे.

राज्यातील सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी, जेणेकरून पशुधनामधील पशुधनामधील संसर्गीक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता तसेच प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.

त्यामुळे जिल्हाधिकारी तथा सक्षम अधिकारी या नात्याने श्री. शिनगारे यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व पशुधनाची ई0अर टॅगिंग करुन त्यांची नोंदणी भारत पशुवन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिकांनी 1 जून 2024 नंतर ईअर टॅगिगशिवाय पशुधनास पशुवैद्यकिय संस्था/ दवाखान्यामधून पशुवैद्यकिय सेवा देऊ नयेत. तसेच आपल्या अधिनस्त असलेल्या कत्तलखान्यामध्ये ईअर टॅग असल्याशिवाय म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल करण्यास परवानगी देण्यात येणार नाही.

नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअर टॅगिग केलेली नसल्यास सर्व महसूल/वन/वीज महावितरण विभागांकडून नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही. कोणत्याही पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिग असल्याशिवाय करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतुकदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. परराज्यातून येणाऱ्या पशुधनास ईअर टॅगिंग केल्याची व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खातरजमा तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी/कर्मचारी करतील. पशुधनास ईअर टॅगिंग केले नसल्यास तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी या पशुधनास ईअर टॅगिंग करून त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेण्यात यावी. 1 जून 2024 नंतर बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंगशिवाय करता येणार नाही, असे या आदेशात नमूद केले आहे.

येत्या 1 जून 2024 पासून ईअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावा-गावातील खरेदी-विक्री व बैलगाडा शर्यती करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. त्यामुळे ईअर टॅगिंग नसलेल्या पशुधनास बाजार समितीमध्ये प्रवेश देण्यात येवू नये व त्यांची खरेदी विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समितीने घ्यावी. तसेच सर्व ग्रामपंचायत/ महसूल विभाग गृहविभागांने ईअर टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देवू नये, असेही या आदेशात म्हटले आहे.

पशुधनाच्या मालकी हस्तांतरणाबाबतच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांकडून त्वरीत अद्ययावत करून घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकाची राहणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये पशुच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची ईअर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येवू नये. दाखल्याबर ईअर टॅगचा क्रमांक नमूद करण्यात यावा, अशाही सूचना या आदेशात दिल्या आहेत.

पशुसंवर्धन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी ठाणे जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे करावे, असे निर्देश श्री. शिनगारे यांनी दिले आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande