ठाणे - मतदानासाठी प्रशासनाबरोबर जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनाही घेणार पुढाकार
ठाणे, 8 मे, (हिं.स.) : आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्य
ठाणे - मतदानासाठी प्रशासनाबरोबर जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनाही घेणार पुढाकार


ठाणे, 8 मे, (हिं.स.) : आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज विविध गृहनिर्माण सोसायट्या, विकासक, व्यावसायिका, औषध विक्रेते यासह विविध संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घेऊन आपआपल्या परिसरातील नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन केले. तसेच प्रत्येक संघटनांनी मतदानाचा टक्का वाढीसाठी ग्राहकांना आवाहन करतानाच त्यांना प्रोत्साहन म्हणून सवलती देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत मतदान टक्का वाढविण्यासाठी विविध संस्था, संघटनांनी पुढाकार घेण्याचे आश्वस्त केले.

मतदान जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस स्वीपचे नोडल अधिकारी तथा सहसंचालक अमोल खंडारे, तहसीलदार अस्मिता मोहिते, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम प्रमाणिकरण समितीचे नोडल अधिकारी मनोज शिवाजी सानप, नायब तहसीलदार स्मितल यादव आदी यावेळी उपस्थित होते. या बैठकीस ठाणे हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे, सहकारी संस्था उपनिबंधक किशन रत्नाळे, सहकार अधिकारी वैभव काळे, औद्योगिक सुरक्षा उपसंचालक प्रवीण पाटील, उल्हासनगर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विजय शिवनानी, कल्याण केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव विरेंद्र सिंग आदी यावेळी उपस्थित होते.

लोकशाही प्रक्रियेत सक्रिय नागरिकांचे महत्त्व असून नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित आणि प्रेरित करण्यासाठी विविध उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. वैद्यकीय सेवांवरील विशेष सवलत देणे, मतदारांशी जुळण्यासाठी गुगल मिटसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे तंत्रज्ञानाचे सहाय्य घेणे, माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करणे आणि जनजागृतीपर मोहिमा राबविणे, आपल्या आस्थापनांमधील कर्मचारी, मजूर यांना मतदानासाठी प्रोत्साहित करून मतदानासाठी सुट्टी देणे अथवा सवलत देणे, मतदार जागृती मंच स्थापन करणे आदी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

मतदानाचा दिवस जवळ आला आहे. येत्या 20 मे रोजी मतदान होणार असून आता 12 ते 18 मे या कालावधीत मतदान जनजागृतीवर भर देण्याची गरज आहे. मतदानापूर्वी सुट्टी आल्यामुळे नागरिक बाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व संस्था, संघटनांनी मोठ्या प्रमाणात जनजागृतीवर भर द्यावा. तसेच मतदारांना आकर्षिक करण्यासाठी आपल्या दुकान, संघटनेमार्फत काही सवलती देता येतील का यावर विचार करावा, असे आवाहन यावेळी श्री. खंडारे यांनी केले.

श्रीमती स्मिता मोहिते यांनी ठाणे जिल्ह्यातील मागील निवडणुकीत झालेल्या मतदानाची माहिती देऊन या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत मांडले. यासाठी समाजातील सर्वच घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मागील निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदारसंघ, क्षेत्रावर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष लक्ष देण्यात यावे. तसेच समाजातील प्रत्येक पात्र मतदारांनी मतदान करावे, यासाठी प्रोत्साहित करावे, असे यावेळी ठरविण्यात आले.

मतदार जनजागृतीसाठी निवडणूक विभागाने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. व्हॉट्सॲप चॅटबॉट (9764348839) हा असाच एक उपक्रम असून चॅटबॉटद्वारे मतदारांना आपल्या मतदान केंद्र, मतदार यादीतील स्वतः क्रमांक, मतदारसंघ आदी माहिती उपलब्ध होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या चॅटबॉटसह इतर तंत्रज्ञानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवावी, असे आवाहन करण्यात आले.

यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील पटांगण, क्लब हाऊसमध्येही मतदान केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना मतदानासाठी बाहेर जाण्याचा त्रास कमी होणार आहे. त्यामुळे या सोसायट्यांमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, यासाठी सर्व संस्थांनी प्रयत्न करावे, असे यावेळी श्रीमती यादव यांनी सांगितले.

लोकशाही प्रक्रिया मजबूत करण्यासाठी व निवडणूक प्रक्रियेत नागरिकांनाच सहभाग वाढविण्यासाठी व ठाणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था, संघटना, बांधकाम व्यावसायिक, औषध विक्रेते संघटना, गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी दिली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande