ठाणे - तृतीयपंथीय समुदायाने घेतली 100 टक्के मतदानाची शपथ
ठाणे, 8 मे, (हिं.स.) २५ ठाणे-लोकसभा मतदारसंघाअंतर्गत १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या स्विप पथकाद्वा
ठाणे - तृतीयपंथीय समुदायाने घेतली 100 टक्के मतदानाची शपथ


ठाणे, 8 मे, (हिं.स.) २५ ठाणे-लोकसभा मतदारसंघाअंतर्गत १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या स्विप पथकाद्वारे ठाण्यातील तलावपाळी परिसरात तृतीयपंथी समुदायासोबत मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. तृतीयपंथीय समुदायात मतदानाचा हक्क व त्याचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी उपस्थित तृतीयपंथीयांनी 100 टक्के मतदान करण्याची शपथ घेतली.

ठाणे शहरात सोमवार,दि.२० मे रोजी मतदान आहे. या मतदान प्रक्रियेपासून कोणताच घटक मतदानापासून वंचित राहू नये यासाठी विविध कार्यक्षेत्रात व परिसरात मतदान जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या सहा.निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तलावपाळी परिसरात तृतीयपंथी समुदायासाठी हा मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

‘राष्ट्राचा सर्वात मोठा सण आणि अभिमान’ या संकल्पनेसह कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तृतीयपंथीय समुदायात मतदानाचा हक्क व त्याचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व तृतीयपंथी व्यक्तींनी येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची शपथ घेतली.

मतदान जनजागृतीसाठी एक विशेष आकर्षण म्हणजे तलावपाळी परिसरात मॅस्कॉट हे मनोरंजक पात्र मतदानाचा प्रसार करत होते. त्यासोबत तृतीयपंथी व्यक्तींनी सेल्फी घेतल्या. मतदाना दिवशी सुट्टी आहे, म्हणून कुठे फिरायला जाऊ नका व घरात न बसता २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

‘मी मतदान करणारंच..... आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा,’ या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदानाची तारीख दर्शवणारे माहितीपत्रकाचे वाटप उपस्थित तृतीयपंथीय सहकाऱ्यांनी नागरिकांना केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande