काँग्रेसने देशाची धर्मशाळा बनवली- गिरीराज सिंह
पाटणा, 09 मे (हिं.स.) : काँग्रेस पक्षाने देशाची धर्मशाळा बनवली आहे. भारताला इस्लामिक राष्ट्र बनवणे अ
गिरीराज सिंह


पाटणा, 09 मे (हिं.स.) : काँग्रेस पक्षाने देशाची धर्मशाळा बनवली आहे. भारताला इस्लामिक राष्ट्र बनवणे असा त्यांचा हेतू असल्याची टीका केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केलीय. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या अहवालात हिंदूंची घटती आणि मुस्लिमांची वाढती लोकसंख्या याबाबत माहिती नमूद आहे. या अहवालावर भाष्य करताना गिरीराज सिंह बोलत होते.

भारताने 1950 ते 2015 या 65 वर्षांच्या कालावधीत बहुसंख्य हिंदू लोकसंख्येमध्ये मोठी घट नोंदवली आहे. या काळात हिंदूंचा वाटा 6 टक्क्यांनी घसरला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश सारख्या इतर देशांशी तुलना केल्यास, बहुसंख्य मुस्लिमांचा लोकसंख्येतील वाटा झपाट्याने वाढला आहे. एका सरकारी अभ्यासात हे सत्य समोर आले आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या साइटवर यासंबंधीची आकडेवारी उपलब्ध आहे. अभ्यासानुसार, भारतात हिंदूंची लोकसंख्या कमी झाली असून मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि शीख धर्मियांची लोकसंख्या वाढली आहे. या काळात लोकसंख्येतील जैन आणि पारशी लोकांचे प्रमाणही कमी झाले आहे. या कालावधीत लोकसंख्येतील मुस्लिमांचा वाटा 5 टक्क्यांनी वाढल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. याशिवाय ख्रिश्चनांचा वाटा 5.38 टक्के आणि शीखांचा वाटा 6.58 टक्के वाढला आहे. एवढेच नव्हे तर बौद्धांचा वाटाही वाढला आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने आपल्या अहवालात एकूण 167 देशांचा अभ्यास केला आहे.

यासंदर्भात गिरीराज सिंह म्हणाले की, काँग्रेसने देशाला धर्मशाळा बनवले आहे. त्यांना भारताला इस्लामिक राष्ट्र बनवायचे आहे. भारतात 1947 मध्ये हिंदूंची लोकसंख्या सुमारे 90 टक्के होती. आज आम्ही फक्त 70 टक्क्यांवर पोहोचलो आहोत. तर स्वातंत्र्याच्या वेळी मुस्लीम लोकसंख्या 8 टक्के होती त्यात वाढ होऊन मुस्लीम लोकसंख्या आता 20 टक्के झालीय. देशात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांना व्होट बँक म्हणून वापरले जातेय. त्यामुळे काँग्रेस मुस्लिमांना आरक्षण जाहीर करताना दिसून येत असल्याचा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, भाजप खासदार साक्षी महाराज यांनी हा अहवाल वाचून मन दुखावल्याचे सांगितले. तसेच देशात तत्काळ प्रभावाने लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याची मागणी त्यांनी केली. जेव्हा-जेव्हा हिंदू कमी होतात तेव्हा देशाची फाळणी होते असा दावा त्यांनी केला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande