नागपूरसह विदर्भात अवकाळी पाऊस
नागपूर, 09 मे (हिं.स.) : नागपूरसह विदर्भात आज, गुरुवारी तब्बल 2 तास मुसळधार अवकाळी पावसाने झोडपले. य
संग्रहित


नागपूर, 09 मे (हिं.स.) : नागपूरसह विदर्भात आज, गुरुवारी तब्बल 2 तास मुसळधार अवकाळी पावसाने झोडपले. या पावसामुळे उन्हाच्या दाहकतेपासून सुटका झाली असली तरी अवकाळी पावसामुळे शेतकरी मात्र त्रस्त झालाय.

हवामान खात्याने नागपूर शहराला गुरूवारी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानुसार सकाळी 9.45 वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. ढगांच्या दाटून आलेल्या अंधारामुळे वाहनचालकांना लो-व्हिडीबीलीटीचा सामना करावा लागला. नागपुरात कालपर्यंत तापमान 42 अंशांच्या आसपास होते. परंतु, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस यामुळे ऋतू बदलल्याचा भास झाला. यावेळी ताशी 18 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. हा पाऊस दुपारी 1 वाजेपर्यंत सुरु होता. नागपुरात अवघ्या 2 तासात 47 मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे शहराच्या खोलगट भागत पाणी साचले. तसेच अनेक भागात झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याच्या घटना घडल्या. पावसामुळे शहरात तब्बल 4 तास वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.

नागपूरसह राज्याच्या इतर भागातही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे फळबाग आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान हवामान खात्याकडून पुन्हा एकदा राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागातर्फे यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande