पुण्यातील तरुणाचा ताम्हणी घाटात मृत्यू
वर्षा पर्यटनादरम्यान प्रवाहात बेपत्ता झाला पुणे, 01 जुलै (हिं.स.) : पुण्यातील ताम्हिणी घाट परिसरात
पुण्यातील तरुणाचा ताम्हणी घाटात मृत्यू


वर्षा पर्यटनादरम्यान प्रवाहात बेपत्ता झाला

पुणे, 01 जुलै (हिं.स.) : पुण्यातील ताम्हिणी घाट परिसरात तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. स्वप्नील धावडे असे या तरुणाचे नाव असून तो आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता. गेले 2 दिवस या तरुणाचा शोध सुरू होता. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाला आज, सोमवारी या तरुणाचा मृतदेह राजगड जिल्ह्यातील मानगाव येथे आढळून आला.
यासंदर्भातील माहितीनुसार स्वप्नील धावडे हे बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय खेळाडू राहिले होते. त्याच आधारे ते भारतीय सैन्यात सामील झाले होते. तब्बल 18 वर्षांच्या सैन्य सेवेनंतर ते मागील वर्षी निवृत्त झाले होते. त्यांची पत्नी पोलिस दलात कार्यरत आहे. त्यांना एक 10 वर्षांची मुलगी आहे. सैन्यात बॉक्सर असलेले स्वप्नील धावडे सध्या जीम ट्रेनर म्हणून काम करीत होते. त्यांना साहसी पर्यटनाची आवड होती. त्यामुळे ते आपल्या मित्र-सहकाऱ्यांसह 29 जून रोजी पुणे जिल्ह्यातील ताम्हीणी घाट परिसरात पर्यटनासाठी गेले होते. या परिसरातील प्लस व्हॅली मधे एकुण तीन कुंड आहेत. पहिल्या कुंडातील पाणी धबधब्यातून वाहत मधल्या कुंडात जाते आणि तिथून ते सर्वात खाली असलेल्या कुंडात जाते. स्वप्नील धावडे आणि त्यांची टीम पावसाळा सुरु होण्यापूर्वी याच कुंडांमधे पोहण्यासाठी उतरले होते. मात्र तेव्हा पाण्याला फार जोर नव्हता. शनिवारी ते आणि त्यांची टीम पुन्हा प्लस व्हॅली मधील सर्वात वरच्या कुंडाजवळ गेले. स्वप्नील धावडे यांनी त्यांच्या जीम मधील सहकाऱ्यांसमोर फेसाळत्या पाण्यात उडी मारली. सुरुवातीला त्यांनी काठावर येण्याचा प्रयत्न केला. मात्र धबधब्याच्या टोकाला आल्यानंतर त्यांची दगडावरील पकड निसटली आणि ते धबधब्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले.
या घटनेचा व्हिडीओ देखील आता पुढे आला आहे. स्वप्नील बेपत्ता झाल्यानंतर पौड पोलिस, ताम्हिणी वनविभाग, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती, शिवदुर्ग टीम लोणावळाने प्लस व्हॅलीच्या वरील बाजूच्या पाण्याच्या दोन्ही कुंडांमध्ये आणि आसपासच्या परिसरात स्वप्नीलचा शोध घेतला. मात्र, या टीमला कोठेही स्वप्नील आढळला नाही. दरम्यान, रविवारी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेदरम्यान या परिसरात शोधकार्य सुरू होते. आजही सकाळी पुन्हा या ठिकाणी शोधकार्य सुरू होते. आज मृतदेह रायगड जिल्ह्यातील मानगाव येथे आढळून आला. पावसाळा सुरू असल्याने अनेकजण वर्षा पर्यटनासाठी ताम्हिणी वन्यजीव अभयरण्यात जातात; परंतु हे क्षेत्र अपघातप्रवण असल्याने या ठिकाणी पर्यटकांना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार

 rajesh pande