नागपूर : दीक्षाभूमीवरील भूमिगत वाहनतळाचे काम रद्द
स्थानिकांच्या हिंसक आंदोलनानंतर घेण्यात आला निर्णय नागपूर, 01 जुलै (हिं.स.) : नागपुरातील दीक्षाभूमी
दीक्षाभूमीवर वाहनतळाच्या विरोधातील आंदोलन


स्थानिकांच्या हिंसक आंदोलनानंतर घेण्यात आला निर्णय

नागपूर, 01 जुलै (हिं.स.) : नागपुरातील दीक्षाभूमी परिसरात सुरू असलेले भूमिगत वाहनतळाचे काम आज, सोमवारी रद्द करण्यात आले. याठिकाणी स्थानिकांनी केलेल्या हिंसक आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला.

यासंदर्भातील माहितीनुसार नागपुरातील दीक्षाभूमी परिसरात सौंदर्यीकरणासह विविध विकास कामे सुरू आहेत. याठिकाणी भूमिगत वाहनतळाची निर्मिती सुरू होती. परंतु, या भूमिगत वाहनतळामुळे दीक्षाभूमीवरील स्तुपाला धोका होण्याची शक्यता असल्याचे सांगत स्थानिक आंदोलकांनी सोमवारी 1 जुलै रोजी तीव्र आंदोलन केले. यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीच्या विरोधात घोषणाबाजी करत बांधकाम साहित्याची जाळपोळ करण्यात आली. याबाबत दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव राजेंद्र गवई यांनी सांगितले की, आम्ही सकाळी 10 वाजताच भूमिगत वाहनतळाचे बांधकाम रद्द करण्याची विनंती करणारे पत्र एनएमआरडीएला दिले होते. प्रारंभी हजार ते दीड हजार आंदोलकांनी होते. नंतर पाहाता पाहाता सुमारे अडीच ते तीन हजार आंदोलक जमले. आणि काही कळायच्या आता संतप्त आंदोलकांनी जाळपोळ सुरू केली असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

दीक्षाभूमी परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या परिसरात संतप्त आंदोलकांनी स्मारक समितीच्या विरोधात घोषणा देत आणि काम थांबवण्याची मागणी करीत तिथे असलेले पत्रे पाडून दिले. तसेच बांधकाम साहित्याला आग लावली. त्याच्या ज्वाळा आणि धुराने परिसर कोंदटला. माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसरात क्यूआरटीसह तगडा पोलिस बंदोबस्त लावला. दरम्यान पोलिस आयुक्तांनी स्मारक समिती सदस्यांशी संपर्क साधून आंदोलक आणि समिती सदस्यांत मध्यस्थी केली.भूमिगत वाहनतळाचे काम रद्द करण्यात येत असल्याचे पत्र स्मारक समिती सदस्यांनी दिल्या नंतर आंदोलक शांत झाले. त्या नंतरही बराच वेळ संतप्त आंदोलक दीक्षाभूमी परिसरातच तळ ठोकून होते. दुपारी साडेचारनंतर स्मारक समितीने एनएमआरडीएचे भूमिगत वाहनतळाचे काम रद्द करण्यात येत असल्याचे पत्र दिल्या नंतर हळुहळु आंदोलक निघून गेले.

दीक्षाभूमीवर आंबेडकरी आंदोलकांनी सुरू केलेल्या आंदोलनाची धग मुंबईत सुरू असलेल्या अधिवेशनातही पोहोचली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लोकभावना लक्षात घेता भूमिगत वाहनतळाचे काम रद्द करण्याची मागणी केली. पुण्यात बोलताना प्रकाश आंबेडकरांनीही हीच मागणी लावून धरली.दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये दिले. हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने सुचविल्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच भूमिगत पार्किंगचे काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते. मात्र लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एक बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने निर्णय घेण्यात येईल. सर्वांचे मत विचारूनच त्यावर निर्णय घेण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

यापूर्वी रविवार 16 जून 2024 रोजी भूमिगत वाहनतळाचे काम त्वरित थांबवण्यात यावे अशी मागणी विविध आंबेडकरी संघटना व अनुयायांनी येथे केली होती. दीक्षाभूमी स्मारक समितीने बोलावलेल्या संवाद बैठकीत अनुयायांनी भूमिगत वाहनतळाला तीव्र आक्षेप नोंदवित संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. त्याची दखल घेत स्मारक समितीचे नवनियुक्त सचिव राजेंद्र गवई यांनी हे बांधकाम करीत असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतींची भेट घेऊन भूमिगत वाहनतळाचा फेरविचार करण्यात यावा अशी मागणी करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र या नंतरही समाधानकारक तोडगा न निघता बांधकाम सुरूच असल्याने आंबेडकरी अनुयायांच्या भावनांचा सोमवारी उद्रेक झाल्याने त्यांनी बांधकामस्थळी जाऊन तीव्र आंदोलन केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande