अपंगत्वावर मात करून तुळा देऊ उघडा बनला किराणा दुकानदार
ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील फांगुळगव्हाण या गावचा आदिवासी म-ठाकूर जमातीचा दिव्यांग तरुण तुळा देऊ उघडा हा बारावी नंतर डी.टी.पी ऑपरेटर म्हणून फांगुळगव्हाण ग्रामपंचायत येथील ग्रामसेवकाच्या हाताखाली मानधनावर कॉम्प्युटर ऑपरेटर बनला. त्याला ठाणे ज
अपंगत्वावर मात करून तुळा देऊ उघडा बनला किराणा दुकानदार


ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील फांगुळगव्हाण या गावचा आदिवासी म-ठाकूर जमातीचा दिव्यांग तरुण तुळा देऊ उघडा हा बारावी नंतर डी.टी.पी ऑपरेटर म्हणून फांगुळगव्हाण ग्रामपंचायत येथील ग्रामसेवकाच्या हाताखाली मानधनावर कॉम्प्युटर ऑपरेटर बनला. त्याला ठाणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून शंभर टक्के अनुदानावर ॲडॅप्टर जोडलेली दुचाकी मोटर सायकल मिळाली. त्याच्या या दुचाकीमुळे अपंगत्वावर मात करून तो आदिवासी विकास विभागाच्या शंभर टक्के अनुदानातून किराणा दुकानदार बनला. एका आदिवासी दिव्यांग तरुणाने अपंगत्वावर मात करून मिळविलेल्या स्वयंरोजगारावर त्याच्या कुटुंबाचा आर्थिक उन्नतीचा नवा इतिहास घडविणारा ठरला, त्याची ही यशोगाथा प्रेरणादायी ठरेल.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील फांगुळगव्हाण या गावच्या म-ठाकूर आदिवासी जमातीच्या तुळा देऊ उघडा या 44 वर्षे वयाच्या दिव्यांग जन्मतःच 100 टक्के अपंग असणाऱ्या तरुणाला स्वतःचा किराणा व्यवसाय सुरू करून अपंगत्वावर मात करण्याची जिद्द निर्माण करून दिली. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने शेतीत मोलमजुरी करणाऱ्या आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या उघडा कुटुंबाने जन्म दिला तो जन्मतःच 100 टक्के दिव्यांग असलेल्या तुळा याला.

फांगुळगव्हाण हे गाव मुरबाड पासून 45 किमी अंतरावर आहे तुळा उघडा याने अपंगत्वावर मात करून त्याने पहिली ते चौथी पर्यंत चे शिक्षण घेतल्यानंतर मोरोशी येथील पोस्ट बेसिक आश्रम शाळेत पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून खाजगी संगणक प्रशिक्षण संस्थेत डीटीपी टॅलीचा अभ्यासक्रम पूर्ण करून तो कॉम्प्युटर ऑपरेटर बनला.

सन 2011-12 मध्ये ग्रामपंचायत फांगुळगव्हाण येथे कॉम्प्युटर ऑपरेटरची जागा रिक्त होती. त्याने त्यावेळी चार हजार रुपयांच्या मानधनावर ग्रामसेवकाच्या हाताखाली कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणजेच संगणक चालकाची नोकरी स्वीकारली. तेथे जन्म-मृत्यूची नोंद, ऑनलाईन-ऑफलाईन नोंदी घेणे, कॅशबुक ऑनलाईन-ऑफलाईन भरणे, घरपट्टी, पाणीपट्टी विविध प्रकारच्या दाखल्याची नोंदी यासारखी कामे तो करू लागला.

तुळा उघडा याला संगणकाचे चांगले ज्ञान असल्याने आजू-बाजूच्या परिसरातील गरजू अज्ञानी आदिवासी बांधवांना रेशन कार्ड, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, डोंगरी विभागाचा दाखला, रहिवासी दाखला, विद्यार्थ्यांना शैक्षणिक योजनेचे दाखले मिळवून देण्यासाठी तो सेवाभावी वृत्तीने मदत करू लागला.

सुमारे साडेसातशे लोकवस्तीच्या शंभर टक्के आदिवासी फांगुळगव्हाण गावात त्याने मोबाईलवर दिव्यांगांचा प्रहार ग्रुप स्थापन करून गरजूंना मदतीचा हात मिळवून देण्यास प्रारंभ केला. त्याच्या या सामाजिक बांधिलकीची नोंद आणि जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने घेऊन सन 2021-22 मध्ये मुरबाड तालुका पंचायत समिती मार्फत तुळा देऊ उघडा याला एक लाख पंधरा हजार रुपये किंमतीची ज्युपिटर कंपनीची बाजूला दोन चाके लावलेली (ॲडॅप्टर) मोटर सायकल शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिली. दिव्यांगावर मात करण्यासाठी ही दुचाकी त्याला मोठा आधार बनली.

तुळाला तेथील आदिवासी आश्रम शाळेच्या शिक्षकांमार्फत आदिवासी विकास प्रकल्पाच्या स्वयंरोजगार योजनेसाठी 100% अनुदानाच्या न्यूक्लिअस बजेट योजनेची माहिती मिळाली. त्याने वर्षातील बाराही महिने चालणारा किराणा व्यवसायाची निवड करून शहापूरच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे प्रकल्प अहवाल सादर केला. सोबत शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, अपंगत्वाचा दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्ड, ग्रामपंचायतचा अनुभवाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला यासारख्या आवश्यक कागदपत्रांसहित किराणा व्यवसायासाठी लागणाऱ्या साहित्याचे दर पत्रक त्याने सादर केले. प्रकल्प अधिकारी श्री राजेंद्रकुमार हिवाळे यांनी आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ निरीक्षक सखाराम भोये तेथे पाठवून किराणा व्यवसायासाठीची जागा पाहून निरीक्षक अहवाल सादर आदेश दिले.

तुळा उघडा याला सन 2022-23 मध्ये न्यूक्लिअस बजेट योजनेंतर्गत शंभर टक्के अनुदानासह रुपये 7300 लाभार्थीच्या आर्थिक सहभाग आणि शासकीय अनुदान 37 हजार 700 असे एकूण 45 हजार रुपयांचे अर्थसाह्य मंजूर झाले. त्याने मुरबाड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या बचत खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली. त्यातून त्याने किराणा साहित्य, वजन काटा, टेबल, फ्रिज, कपाट, रॅक, प्लास्टिकच्या पिशव्या, तेल इत्यादी वाण सामानासहित गोळ्या, बिस्किटे, अंडी, चहा पावडर, थंड पेय इत्यादी साहित्य उपलब्ध करून घेतले.

आदिवासी दिव्यांग तुळा देऊ उघडा हा आपल्या प्रिन्स नावाचा मुलगा यांच्यासह आज दिव्यांगत्वावर मात करून समर्थ जीवन जगू लागला आहे. त्याच्या या स्वयंव्यवसायाला आजूबाजूच्या गावांमधून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने दिलेली दुचाकी मोटर सायकल अपंगत्वावर मात करण्यास सहाय्यभूत ठरली तर शहापूरच्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने दिव्यांग असूनही आपल्यावर 100% विश्वास दाखवून स्वयंरोजगार उभारण्यास आर्थिक मदतीचा हात दिला. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करताना तुळा उघडा दिव्यांगावर मात करण्यास परमेश्वराने ही बळ दिले, याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.

लेखक:-

धनंजय प्र. कासार,

सहाय्यक छायाचित्रकार,

जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे

संपादन:-

मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी

ठाणे

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande