चंद्रपूर, 12 सप्टेंबर (हिं.स.) :
शहरातील स्थानिक जिल्हा क्रिडा संकुल परिसरातील खाजगी 'कोचिंग क्लासेस' च्या एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने क्लासेसच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी समोर आली. प्रांजली हनुमंत राजूरकर असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील विद्यार्थिनी प्रांजली हनुमंत राजूरकर ही मागील दोन वर्षापूर्वी चंद्रपुरात शिक्षणासाठी आली. यंदा ती इयत्ता बारावीत असून, येथील खाजगी कोचिंग क्लासेस येथे 'निट'ची तयारी करीत होती. याच क्लासेसच्या बाजुला मुलींचे वसतिगृह आहे. तिथे प्रांजली तिच्या खोलीत एकटीच राहत होती. बुधवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत तिने कुणाचाही भ्रमणध्वनी उचलला नाही. त्यामुळे तिची खोलीची तपासणी केली असता, तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. तेथे तिचा 'सुसाईड नोट' आणि चित्रफितही होती. या आत्महत्येची माहिती रामनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव