पलक्कड, 02 सप्टेंबर (हिं.स.) : जाती आधारित जनगणना ही समाजाच्या विकासाठी योग्य आहे. परंतु, याचा निवडणुकीच्या राजकारणात राजकीय वापर होऊ नये. सरकारने केवळ आकडेवारीसाठी जात जनगणना करावी असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व्यक्त केले. केरळच्या पलक्कड येथे आज, सोमवारी संघाच्या तीन दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठकीचा समारोप झाला. यानुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर म्हणाले की, आपल्या हिंदू समाजात जात हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. आपल्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी जनगणना महत्त्वाची आहे. हे अत्यंत गांभीर्याने केले पाहिजे. सरकारला कोणत्याही जाती किंवा समुदायाच्या कल्याणासाठी डेटा गोळा करणे आवश्यक आहे. यापूर्वीही असे घडले आहे, परंतु जातीय जनगणना समाजाच्या भल्यासाठीच केली पाहिजे. त्याला निवडणुकीचे राजकीय हत्यार बनवू नये असे आंबेकर म्हणाले.
यावेळी कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावर आंबेकर म्हणाले की, कोलकाता बलात्कार-हत्या ही दुर्दैवी घटना आहे. सगळ्यांना याची काळजी आहे. देशात अशा घटना वाढत आहेत. सरकारची भूमिका, अधिकृत यंत्रणा, कायदा, शिक्षा यावर आम्ही बैठकीत चर्चा केली. अशा प्रकरणांचा फेरविचार करण्याची गरज आहे, असे प्रत्येकाचे मत आहे, जेणेकरून आपण जलदगती प्रक्रियेचा अवलंब करून पीडितेला न्याय मिळवून देऊ शकू असे त्यांनी सांगितले. यासोबतच समान नागरी कायद्याबाबत त्यांनी सांगितले की, समान नागरी संहिता (यूसीसी) मॉडेल आधीच लोकांमध्ये आहे. उत्तराखंडमध्ये यूसीसी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी ते सार्वजनिक डोमेनमध्ये ठेवले होते. त्यामुळे त्यांना 2 लाखांहून अधिक अर्ज आले आणि त्यांनी त्यावर चर्चा केली. मला वाटते की ते आता सार्वजनिक डोमेनमध्ये आहे. जनतेला याचा अनुभव आहे, मग आपण त्यावर चर्चा करू शकतो असे आंबेकर यांनी सांगितले.
यासोबतच बांगलादेशातील परिस्थितीवर देखील संघाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे आंबेकर यांनी सांगितले. बैठकीत अनेक संघटनांनी बांगलादेशातील परिस्थितीबाबत तपशीलवार अहवाल सादर केला आहे. बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांबद्दल सर्वांनाच चिंता आहे. तेथील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांचे रक्षण करण्यासाठी आम्ही बांगलादेश सरकारशी चर्चा करण्याची विनंती केल्याचे आंबेकर म्हणाले. तसेच संघाच्या बैठकीत वक्फ बोर्डाशी संबंधित घटना दुरूस्तीवरही बैठकीत चर्चा झाली. हा मुद्दा खूप मोठा आहे. यावर अजून व्यापक पातळीवर चर्चा व्हायची आहे. वक्फबाबत मुस्लिम समाजाकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याचे आंबेकर यांनी सांगितले.
भाजपचा विषय कौटुंबिक
लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपाध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले होते की, 'आता भाजप मोठा झाला आहे, आता संघाची गरज नाही' राजकीय वर्तुळात हा विषय प्रचंड गाजला होता. परंतु, संघाने कधीही याबाबत जाहीर भाष्य केले नव्हते. यासंदर्भातील प्रश्नाच्या सुनील आंबेकर म्हणाले की, 'आमच्या ध्येयाबद्दलची मूळ कल्पना सर्वांना स्पष्ट आहे, बाकीचे प्रश्न सोडवले जातील, असे आहे. ही एक कौटुंबिक बाब असून यावर तोडगा काढला जाईल. पल्लकड येथे झालेल्या 3 दिवसीय बैठकीत सर्वांनीच सहभाग नोंदवला. सर्वकाही व्यवस्थित असल्याचे आंबेकर यांनी सांगितले.
-----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी