धुळे, 15 जानेवारी (हिं.स.)राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संकल्पनेतुन संपुर्ण देशभरात ‘आपदा मित्र’ही योजना राबवण्यात येत आहे. यासाठी धुळे जिल्ह्यातील 300 आपदा मित्र प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. आपदा मित्र प्रशिक्षणासाठी इच्छुक युवक युवतींनी गुगल लिंकवर नाव नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संकल्पनेतुन संपुर्ण देशभरात ‘आपदा मित्र’ही योजना राबवण्यात येत आहे. आपत्ती दरम्यान ‘प्रथम प्रतिसादकर्ता’हा नेहमी स्थानिक रहिवासी असतो. यास्तव स्थानिकस्तरावर उद्भवणाऱ्या आपत्तींना तात्काळ प्रतिसाद देण्याकरीता स्थानिक लोकांना आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण देऊन सक्षम करणे हे या योजनेचे मुळ उदिष्ट आहे. या योजनेच्या माध्यमातुन जीवित हानी कमी करणे, समाजात आपत्ती व्यवस्थापन विषयक जनजागृती करणे व आपत्तीला प्राथमिकस्तरावर प्रतिसाद देण्याकरिता मनुष्यबळ तयार करणे अशा अनेक बाबी साध्य होणार आहेत.
राज्य शासनाने 16 जिल्ह्यात राज्य शासनांमार्फत ‘आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम’राबविण्याबाबत मान्यता दिलेली आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्यात 300 आपदा मित्र प्रशिक्षणासाठी तयार करण्यात येणार आहे. या आपदा मित्रांना शासनाकडून निवड करण्यात येणा-या यंत्रणेमार्फत आपत्ती व्यवस्थापन विषयांबाबत 12 दिवसाचे निवासी प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षणाकरिता वय वर्षे 18 ते 45 या गटातील शारिरिक व मानसीकदृष्ट्या सक्षम असलेल्या सामान्य नागरिक, महाविद्यालयीन विदयार्थी, अशासकीय संघटना (एनजीओ), आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, शासकीय व निमशासकीय कर्मचारी इत्यादी यांचा समावेश असेल. तथापि, डॉक्टर, माजी सैनिक, स्थापत्य अभियंता यांच्याकरिता वयोमर्यादा 55 वर्षापर्यत राहील (मात्र त्यांना अपघात विमा सुविधा अनुज्ञेय राहणार नाही.) सदर नोंदणी करतांना इच्छुक महिलांचा समावेश करण्याबाबतही नमुद आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग नोंदविणाऱ्या आपदा मित्रांना विहित करण्यात आलेले 12 दिवसांचे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर शासनाकडून 3 वर्षांकरीता आपत्ती समयी शोध व बचाव कार्य करतांना अपघात झाल्यास रु. 5 लक्ष मर्यादेत अपघात विमा तसेच वैयक्तीक आपत्कालीन प्रतिसाद कर्ता संच पुरविण्यात येईल.
याकरिता जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवती, महिला,पुरुष, स्वंयसेवक यांनी https://docs.google.com/spreadsheets/d/1Z7D4SVOuH-14d_sib94Sk3dOEhP4pUYt9yU4ZfNzhJI/edit?gid=0#gid=0 या गुगल लिंक वर जाऊन आपली संपुर्ण माहिती भरावी. अधिक माहिती करीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागास 8698862890/9834139449 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ही माहिती 17 जानेवारीपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्ष ddmo.dhule@gmail.com या ईमेल आयडीवर पाठविण्यात यावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर