नवी दिल्ली , 15 जानेवारी (हिं.स.)।काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांनी आज (दि.15) दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधीदेखील उपस्थित होते. 9-कोटला मार्गावरील इंदिरा गांधी भवन आता देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या नवीन मुख्यालयाचा पत्ता बनला आहे. या उद्धाटन सोहळ्यासाठी काँग्रेसचे नेतेमंडळी हजेरी लावली होती.
काँग्रेसचे जुने मुख्यालय लुटियन्स बंगला झोनमधील 24 अकबर रोड येथे होते. पण आता काँग्रेस मुख्यालयाचा नवा पत्ता कोटला मार्गावरील 9-ए इंदिरा गांधी भवन असा झाला आहे. 28 डिसेंबर 2009 रोजी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्या हस्ते नवीन इमारतीची पायाभरणी करण्यात आली होती.
नवीन काँग्रेस कार्यालयाच्या तळमजल्यावर डाव्या बाजूला एक उच्च तंत्रज्ञानाचा पत्रकार परिषद कक्ष तयार करण्यात आला आहे. नवीन इमारतीच्या अगदी मध्यभागी स्वागत कक्ष आहे, त्याच्या मागे एक कॅन्टीन बांधलेले आहे. काँग्रेस मीडिया प्रभारी यांचे कार्यालय इमारतीच्या डाव्या बाजूला असेल. यासोबतच टीव्ही वादविवादांसाठी छोटे ध्वनीरोधक कक्ष बनवण्यात आले आहेत. याशिवाय पत्रकार आणि कॅमेरामनसाठी बैठकीच्या खोल्याही बनवण्यात आल्या आहेत. विशेष कार्यक्रमांसाठी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर डाव्या बाजूला एक हाय-टेक सभागृह बांधण्यात आले आहे. यासोबतच शेतकरी विभाग, डेटा विभाग असे अनेक विभाग निर्माण करण्यात आले आहेत.दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिकाऱ्यांची कार्यालये असतील. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची स्वतंत्र कार्यालये असतील.तर पक्षाच्या अनेक जुन्या नेत्यांची छायाचित्रेही नव्या मुख्यालयात लावण्यात आली आहेत. यातील अनेकांनी पक्ष सोडला आहे.
सुप्रीम कोर्टाने एका आदेशात राजकीय पक्षांची कार्यालये लुटियन झोनमधून हटवण्यास सांगितले होते. त्यानंतर 2005-06 मध्ये केंद्र सरकारने आयटीओ चौक आणि कॅनॉट प्लेस यांना जोडणाऱ्या दीनदयाळ उपाध्याय मार्गाजवळ राजकीय पक्षांना कार्यालयीन भूखंड देण्याची प्रक्रिया सुरू केली.भाजप आणि आम आदमी पक्षाची कार्यालयेही काँग्रेसच्या नवीन मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहेत. दिल्ली काँग्रेसचेही कार्यालय दीनदयाल उपाध्याय मार्गावर आहे. दिल्ली भाजपचे कार्यालयही लवकरच येथे स्थलांतरित होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode