नंदुरबार, 15 जानेवारी (हिं.स.) जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांना दरमहा नियमित अन्नधान्य वितरण सुनिश्चित करून ते वितरित करणे
बंधनकारक असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा पुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या
बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, सहायक पुरवठा अधिकारी गोपाल घडमोडे, हिंदुस्तान
पेट्रोलियम गॅस कंपनीचे नोडल अधिकारी तसेच तहसीलदार, पुरवठा निरीक्षक व इतर संबंधित अधिकारी
उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जिल्ह्यातील 100 टक्के आधार सिडींग पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचे
अभिनंदन केले. नंदुरबार जिल्ह्यातील धान्यवाटप सरासरी 90-91 टक्के असल्याने त्यांनी उर्वरित
शिधापत्रिकांच्या तपासणीचे निर्देश दिले. तसेच, भारतीय अन्न महामंडळाने वेळेत अन्नधान्याचा पुरवठा
करण्यावर भर दिला. गॅस जोडणी नसलेल्या कुटुंबांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून गॅस सिलेंडर उपलब्ध
करून देण्यासाठी तहसीलदार आणि गॅस कंपन्यांना समन्वय साधण्याचे निर्देश दिले. प्रलंबित
शिधापत्रिकांच्या मोबाईल सिडींग व ई-केवायसीसाठी गावोगावी कॅम्प आयोजित करण्याचे आदेशही त्यांनी
दिले.
डॉ. मित्ताली सेठी यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांना दरमहा अन्नधान्य
वितरण बंधनकारक आहे. लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रास्तभाव
दुकानदारांनी जबाबदारीने काम करावे. जर कोणत्याही दुकानदाराने अन्नधान्य वितरणात टाळाटाळ केली
तर नागरिकांनी तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक 02564-210009 किंवा जिल्हा कार्यालयाच्या
dso.nandurbar@gmail.com ई-मेलवर तक्रार दाखल करावी, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी
डॉ. सेठी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर