अहिल्यानगर, 15 जानेवारी (हिं.स.):- श्रीमद् भागवताच्या महात्म्यात श्री नारदजी सांगतात की, जेव्हा मनुष्याच्या अनेक जन्मातील केलेल्या पुण्याचा उदय होतो तेव्हा त्याला सत्संग प्राप्त होतो, सत्संगामुळे आपल्या जीवनातील दुःखाला कारण असणारे अज्ञान आणि अज्ञानामुळे निर्माण होणारे मोहोळ मद इत्यादी विकार नाहीसे होतात.सत्संगामुळे बुद्धीत विवेकाचा उदय होतो आणि विवेकाने मनुष्य सुखी होतो असा दुर्लक्ष सत्संग आपणास कथा श्रवणाच्या निमित्ताने प्राप्त होत आहे.सत्संगाच्या प्राप्तीसाठी आपण सावध,साक्षेपी आणि दक्ष राहिलो तर आपल्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त होतो यात शंका नाही.जिथे भागवताची कथा सांगितली जाते ते स्थान नक्कीच पवित्र होत असते. या हिंदुस्थानामध्ये ज्यांनी जन्म घेऊन भागवत कथा ऐकली नाही त्याचे जीवन व्यर्थ जाते आणि त्याचे जीवन एखाद्या चिलयासारखे होते.कथेचे सामर्थ्य महान असून मनुष्याने आपल्या जीवनामध्ये कथेचे स्मरण श्रद्धेने करावे तर नक्कीच उद्धार होतो.शांती मिळते.सध्या समाजामध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले असून आत्महत्येने शरीर मरते,मात्र मन मरत नाही.हा समाजासमोर उपाय नाही असे प्रतिपादन हभप मंदारबुवा रामदासी यांनी केले.
पंचवटी नगर श्रीराम मंदिर येथे बाळासाहेब बारस्कर परिवाराच्या वतीने पौष मास निमित्त श्रीमद् भागवत कथेला प्रारंभ झाला.यावेळी हभप मंदार बुवा रामदासी,माजी नगरसेविका दिपाली बारस्कर,शारदा ढवण,माजी नगर सेवक सतीश बारस्कर,सचिन बारस्कर,अनिल ढवण आदीसह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीमद् भागवत कथेतून समाज समृद्ध होण्यासाठी मदत होत असते.धार्मिक कार्यक्रमातून समाज एकवटला जातो त्या माध्यमातून चांगल्या विचारांची देवाण-घेवाण होत असते.आपल्या संस्कृतीचे जतन होत चांगल्या विचारांची पिढी निर्माण होते.श्रीमद् भागवत कथेच्या शुभारंभ प्रसंगी भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक काढण्यात आली.यावेळी भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते .हभप मंदार बुवा रामदासी यांच्या मधुर वाणीतून कथा सप्ताह कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे तरी श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा.तसेच महाप्रसादाचे आयोजन देखील केले जाते,अशी माहिती माजी नगरसेविका दिपाली बारस्कर यांनी दिली.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni