ठाणे, 3 जानेवारी (हिं.स.)। हिंदायान फाउंडेशनच्यावतीने दिल्ली - ठाणे - मुंबई - पुणे या मार्गे सायकल मोहीम आयोजित करण्यात आली असून या मोहिमेत हजारो सायकल प्रेमी सहभागी होणार आहेत.
यावर्षी या मोहिमेची थीम कॅन्सर जनजागृती असून या मोहिमेतून कॅन्सर या आजाराविषयी जनजागृती तर केली जाणार आहेच पण त्याचबरोबर कॅन्सरग्रस्तांसाठी केशदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केशदान या अनोख्या मोहिमेव्दारे आपल्या केसांची एक बट दान करण्याचे आवाहन हिंदायान फाऊंडेशनचे प्रमुख विष्णुदास चापके यांनी आज ठाणे महानगरपालिकेच्या स्व.नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले .
या पत्रकार परिषदेला श्री.चापके यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, आम्ही cycle प्रेमी फाउंडेशनच्या संस्थापिका - अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे, श्री.सानप यांची कन्या नक्षत्रा मनोज सानप आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.चापके म्हणाले की, कर्करोगाच्या उपचारांमुळे केस गळून मानसिक स्थिती डळमळीत झालेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी हिंदायान फाऊंडेशनने अनोखे पाऊल उचलले आहे. दिल्लीवरून ही सायकल मोहीम ८ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरू होत असून ती ठाणे येथे १५ फेब्रुवारी २०२५ रोजी पोहोचणार आहे.
या मोहिमेला जिल्हाधिकारी कार्यालय , ठाणे महापालिका आयुक्त कार्यालयाचे अधिकारी यांच्या हस्ते झेंडा दाखविला जाणार आहे. तिथून ही सायकल मोहीम मुंबई येथे रवाना होईल. तेथील आझाद मैदान येथे सकाळी ९.३० वाजता केशदान या मोहिमेस सुरुवात होईल. ज्यांना या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी मुंबई या ठिकाणी केशदान करण्यासाठी जरूर उपस्थित राहावे, असे आवाहन श्री.चापके यांनी केले.
मुंबई वरून ही मोहीम १६ फेब्रुवारी रोजी पुढे जाणार असून तिथे पोलीस मैदानात ही मोहीम सुरू होईल. या मोहिमेत ठाण्यातील महिलांनी आणि मुलींनी केशदान मोहिमेत सहभागी व्हावे, असे संस्थेच्या वतीनेही आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांची मुलगी नक्षत्रा हिने आतापर्यंत वर्ष 2020 आणि 2022 असे दोनदा केशदान केले आहे. या गोष्टीचे मला कधीच मोठेपणा वाटला नाही, असे नक्षत्राने सांगितले. मी प्रसिद्धीसाठी हे दान केलेले नाही. माझ्या प्रोत्साहनामुळे काही मैत्रिणींनी देखील केशदान केले. केशदानासाठी १२ इंच केस असणे आवश्यक आहे. आपल्या या लहानशा कृतीमुळे एखाद्या गरजू व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो याचे मनस्वी समाधान मिळते, असेही ती म्हणाली.
श्री.सानप म्हणाले की, शक्य असेल त्या सर्वांनी केशदान करावे. त्यांनी आपली मुलगी केशदानाकडे कशी वळली हे सांगितले. नक्षत्रा म्हणाली की, तुमची केस कापायची इच्छा झाली, तर तुमचे हे केस देखील कोणाच्या हसण्याचे कारण बनेल हे लक्षात ठेवा. हे दान वेदनाहीनआहे. केशदानामुळे कोणाचेही नुकसान होत नाही. मला माझ्या आईमुळे केशदानाविषयीची माहिती मिळाली. मी केशदान केल्यानंतर आता माझ्या मैत्रिणीही केशदान करीत आहेत. परंतु केशदानासाठी दात्यांनी मोठ्या संख्येने पुढे येण्याची गरज असल्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
आम्ही cycle प्रेमी फाउंडेशनच्या संस्थापिका - अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी या सायकल मोहिमेत आणि केशदान मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
कर्करोगाचे निदान झाल्यामुळे आधीच गर्भगळीत झालेल्या रुग्णांचे उपचारांदरम्यान केस गळण्यास सुरुवात होते. या रुग्णांना हा धक्का सहन करणे कठीण असते. त्यांना दिलासा मिळावा, या उद्देशाने या संस्थेने 'केशदान मोहीम' हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत महिलांनी आपल्या केसांची एक बट दान करावी, असा विचार आहे. त्या केसांच्या माध्यमातून कर्करोगग्रस्तांसाठी विग तयार करण्यास मदत होणार आहे.
मुंबई
वेळ: ९.३० सकाळी , १५ फेब्रुवारी, २०२५.
स्थळ: आझाद मैदान
पुणे
वेळ : सकाळी ९ वाजता, १९ फेब्रुवारी २०२५
स्थळ : शनिवारवाडा प्रांगण. (Parking area).
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर