नवी दिल्ली, 31 जानेवारी (हिं.स.) : केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील वर्ष 2025-26 साठीचा पहिला अर्थसंकल्प शनिवारी (१ फेब्रुवारी) संसदेत सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वाधिक म्हणजे आठ वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला ठरणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प अनेक अर्थांनी विशेष असणार आहे. कारण या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींमधूनच आगामी वर्षांच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. दरम्यान, हा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लक्ष्मी मातेने देशातील गरीब, मध्यमवर्गावर आपली कृपादृष्टी कायम ठेवावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पाकडे देशवासियांसह व्यापार आणि अनेक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी, सरकारने वित्तीय तूट कमी करण्यासाठी आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी भांडवली खर्चात वाढ करणे अपेक्षित आहे. 2025 च्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा अपेक्षित आहेत.गेल्या काही अर्थसंकल्पांत सरकारने पुरवठा साखळी कशी मजबूत करता येईल, यावर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसून येते. सोबतच पायाभूत सुविधांचा विकास, विस्तार कसा करता येईल, यावरही विशेष लक्ष दिलेलं आहे. क्रिप्टोकरन्सी तसेच अन्य धनसंपत्तींवर करवसुली करण्याचीही तरतूद याआधी केलेली आहे. याचा मध्यमवर्ग आणि श्रीमंतावर जास्त परिमाण झालेला आहे. यावेळी सरकार मध्यमवर्गाला दिलासा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टॅक्स स्लॅबमध्ये बदल करून हा दिलासा दिला जाऊ शकतो. तसेच नव्या करप्रणाली अंतर्गत सँडर्ड डिडक्शनच्या लाभामध्येही वाढ केली जाऊ शकते. सोबतच महागाई, खाद्यान्नांच्या किंमतीत होणारी वाढ नियंत्रित करण्यासाठीही सरकार यावेळी काही वेगळे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांवरील जीएसटीत घट केली जाऊ शकते.
हाऊसिंग सेक्टरमध्ये तेजी यावी यासाठी सरकार काही नव्या योजनांची घोषणा करू शकते. यासह भारतीय रिझर्व्ह बँकेशी चर्चा करून व्याज दरांत कपात करून नागरिकांना दिलासा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोबतच इंधन, खाद्य तेलाच्या किंमती नियंत्रित करण्यासाठीही काही ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. यावेळच्या अर्थसंकल्पात सरकार पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार करू शकते. सोबतच मनरेगा या योजनेतही काही बदल होण्याची शक्यता आहे. यासह सरकार शिक्षण, आरोग्य, महिला सशक्तीकरण यासाठीही भरघोस तरतूद करण्याची शक्यता आहे.
दरम्यान अर्थसंकल्प सादर होण्याआधीच भारतीय शेअर बाजार, सराफा बाजारात मोठे चढ उतार पाहायला मिळत आहेत. या अर्थसंकल्पात नेमकं कोणाला दिलासा मिळणार, कोणाच्या खिशाला कात्री लागणार? याचे अंदाज लावले जात आहेत. सामान्यत: भारतीय शेअर बाजार शनिवार आणि रविवारी बंद असतो. पण काही प्रसंगी बाजारात ट्रेडिंग सुरू असते. त्याचप्रमाणे फेब्रुवारीचा पहिला दिवस म्हणजे १ फेब्रुवारी रोजी शनिवार असूनही या दिवशी शेअर बाजार खुला राहणार आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजनं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, शेअर बाजार १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता उघडेल, जो दुपारी ३.३० वाजेपर्यंत खुला राहील. याआधीही शनिवारी अर्थसंकल्प सादर झाला असताना शेअर बाजार खुला होता. शनिवारी ज्यांना बाजार सुरू होण्यापूर्वी ट्रेड करायचं आहे, ते सकाळी ९ ते ९:०८ या वेळेत ट्रेड करू शकतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी