नवी मुंबई, 4 जानेवारी (हिं.स.) : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हवा गुणवत्तेमध्ये सुधारणा व्हावी हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्याकडे विशेष लक्ष देत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 30 डिसेंबरपासून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत आठही विभाग कार्यालय क्षेत्रात दिनांकनिहाय विविध रस्त्यांच्या सखोल स्वच्छेतेचे नियोजन करण्यात आले असून अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ 1 उपआयुक्त डॉ. अजय गडदे व परिमंडळ 2 उपआयुक्त संतोष वारुळे तसेच परिमंडळ 1 चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्यासह विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली संबंधित अधिकारी, कर्मचारीवृंद तसेच स्वच्छताकर्मी यांच्या माध्यमातून धुळीचे प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने साफसफाई करण्यात येत आहे. यामध्ये रस्ते, पदपथ यांच्या कडेला साठून राहिलेली गाळाची माती व कचरा यांची हँडब्रशने व त्यानंतर प्रक्रियाकृत पाणी मारुन यांत्रिकी वाहनाने साफसफाई करण्यात येत आहे. तसेच फॉगींग मशीनव्दारे हवेत पाण्याची फवारणी करुन धूळीचे प्रमाणही कमी करण्यात आले आहे. पदपथाच्या बाजूच्या भिंती, कुंपण, शिल्पाकृती यांचीही साफसफाई करण्यात आली आहे. आज 4 जानेवारी रोजी बेलापूर विभागात क्रित फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे यांच्या माध्यमातून बेलापूर जेट्टी, सेक्टर 15 याठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच हावरे सर्कल ते अपोलो सिग्नल या मुख्य रस्त्यावरील व परिसरातील सखोल स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले. वाशी विभागातही सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली जैन मंदिर ते संतोष डेअरी, सेक्टर 9 ए व 10 ए या रस्त्यावर, पदपथावर व परिसरात सखोल स्वच्छता करण्यात आली. कोपरखैरणे विभागातील तीन टाकी ते वैकुंठधाम या परिसरात सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी सुनिल काठोळे यांच्या नियंत्रणाखाली त्याचप्रमाणे दिघा एमआयडीसीतील व्होडाफोन कंपनी ते स्मिथ हॉटेल या रस्त्यावर सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी भरत धांडे यांच्या नियंत्रणाखाली सखोल स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. आगामी 13 जानेवारीपर्यंत दररोज अशा प्रकारच्या सखोल स्वच्छता मोहीमा आठही विभाग कार्यालय क्षेत्रात नियोजित कृती आराखड्यानुसार राबविण्यात येणार आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मेघा माने