अकोला, 7 जानेवारी (हिं.स.) अकोला शहरातील जुना हिंगणा येथील शेजारी राहणाऱ्या दोन जणांच्या किरकोळ वादातून एका महिलेची हत्या झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे. सविता ताथोड अस या मृत महिलेच नाव आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक सविता ताथोड आणि त्यांचा मारेकरी धीरज चुंगडे यांच्या मध्ये दोन महिन्याआधी किरकोळ वाद झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सविता ताथोड पहाटे सहाच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत मॉर्निंग वॉक करिता गेल्या असता आरोपी धीरजने घराच्या काही अंतरावरच असलेल्या मुख्य रस्त्यावर सविता ताथोड यांना अडवून गळा आवळला आणि खाली पाडण्यात आले. सोबत असलेल्या महिलेनी आणि तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने ताथोड यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपीने ताथोड यांचं डोकं रस्त्यावर आपटून त्यांना रक्तबंबाळ केलं. काही वेळातच सविता ताथोड यांचं मृत्यू झाला. यानंतर आरोपीने येथून पळ काढला होता. दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर पुढील तपास करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे