रत्नागिरी : खल्वायनच्या मासिक संगीत सभेत शनिवारी ज्योती खरे-यादवार यांचे गायन
रत्नागिरी, 10 ऑक्टोबर, (हिं. स.) : येथील खल्वायन संस्थेची 318 वी मासिक संगीत सभा शनिवारी, दि. 11 रोजी सायंकाळी होणार असून यावेली ऐरोली (ठाणे) येथील ज्येष्ठ गायिका श्रीमती ज्योती खरे-यादवार यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच भक्तिनाट्य गीतांचे
खल्वायनचे निमंत्रण


रत्नागिरी, 10 ऑक्टोबर, (हिं. स.) : येथील खल्वायन संस्थेची 318 वी मासिक संगीत सभा शनिवारी, दि. 11 रोजी सायंकाळी होणार असून यावेली ऐरोली (ठाणे) येथील ज्येष्ठ गायिका श्रीमती ज्योती खरे-यादवार यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच भक्तिनाट्य गीतांचे सादरीकरण होणार आहे.

नेहमीप्रमाणेच रत्नागिरी एसटी बसस्थानकासमोरील सौ. गोदूताई जांभकर महिला विद्यालयात शनिवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ही कै. शामराव भिडे स्मृती मासिक संगीत सभा रंगणार आहे.

श्रीमती खरे यांचे शास्त्रीय संगीताचे संगीत विशारदपर्यंतचे शिक्षण कै. मालतीबाई गोसावी व कै. पंडित वसंतराव गोसावी ( कल्याण) यांच्याकडे झाले. त्यांनी संगीत अलंकार ही पदवी त्यांनी प्राप्त केली. त्यापुढे त्यांना जयपूर घराण्याचे गायक कै. पंडित रत्नाकर पै यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेऊन माणिक वर्मा, डॉ. अशोक रानडे , इंदिराबाईं खाडिलकर अशा थोर परीक्षकांकडून वाहवा मिळविली आहे. गायनासाठी त्यांना १९८० साली केंद्रीय शिष्यवृत्ती तसेच सुलश्री प्रतिष्ठानची शिष्यवृत्ती मिळाली आहे. एमए (संगीत) ही पदविही त्यांना प्राप्त आहे.

आकाशवाणी, दूरदर्शनवर सुमारे २८ वर्षे त्यांचे गायनाचे कार्यक्रम सादर झाले आहेत. महाविद्यालयात काम करीत असताना बेस्ट म्युझिक डिपार्टमेंट म्हणून त्यांचा कुलगुरूंकडून गौरव झाला होता. निवृत्त होताना बेस्ट टीचर म्हणून त्यांचा सन्मान झाला होता. कोजागिरी, होळी, पाऊस गाणी अशावर आधारित त्यांनी कार्यक्रम सादर केले आहेत. तसेच विविध रागावर आधारित २०० स्वरचित बंदिशी त्यांनी रचल्या आहेत.

त्यांच्या रत्नागिरीतील कार्यक्रमाला हार्मोनियमची साथ मुंबईचे ज्येष्ठ वादक पंडित प्रकाश चिटणीस करणार आहेत. चिटणीस यांनी हार्मोनियम व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण संगीततीर्थ पंडित विनायकराव काळे यांच्याकडून घेतले आहे. तबलासाथ रत्नागिरीतील हेरंब जोगळेकर करणार आहेत.

सर्व रसिकांसाठी ही मैफल विनाशुल्क असून, सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande