छत्रपती संभाजीनगर, 11 ऑक्टोबर (हिं.स.) स्वातंत्र्योत्तर भारतात पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला ’एकात्म मानव दर्शन’ हा विचार अत्यंत मूलभूत व क्रांतीकारक ठरला आहे. या विचाराचा पदवी अभ्यासक्रमात समावेश करुन अधिक चिंतन, मनन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ डॉ.आनंद मापुस्कर यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कार्यक्रम अधिकारी यांची एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. पंडित दीनदयाल उपाध्याय : एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सवानिमित्त हा कार्यक्रम नाट्यगृहात घेण्यात आला. या कार्यशाळेचे उदघाटन कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.आनंद मापुस्कर यांची उपस्थिती होती. प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, संचालक डॉ.सोमीनाथ खाडे मंचावर उपस्थित होते. दिवसभरातील विविध सत्रात शिक्षणतज्ञ् डॉ,उपेंद्र कुलकर्णी, डॉ. नितीन खर्चे व प्रा संजय साळवे यांचे ' एकात्म मानव दर्शनातील पर्यावरणाचे चिंतन, आर्थिक चिंतन व कौटुंबिक चिंतन' या विषयावर व्याख्यान झाले.
या एकदिवशीय कार्यशाळेत चार जिल्हयातून २२५ महाविद्यालयांचे कार्यक्रमाधिकारी सहभागी झाले. प्रारंभी कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी दीपप्रज्वलन करुन कार्यशाळेचे उद्घाटन केले. उद्घाटन सत्रात डॉ.आनंद मापुस्कर यांनी बीजभाषण केले. ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय मानवतवाद याची चर्चा पुर्वी जगभर होत होती. मात्र पंडित दिनदयाळ यांनी ’एकात्म मानव दर्शन’ हा अस्सल भारतीय मातीतील व संस्कृतीमधील विचार मांडला. जुलै १९६५ मध्ये मुंबईत त्यांनी दिलेली चार व्याख्याने म्हणजेच हा विचार होय. या विचारधारे मुळे भारतीय संस्कृतीला चालना मिळाली. ’व्यष्टी, समष्टी आणि परमेष्टी’ हे तिनही घटक यात महत्वाचे आहेत, या महत्त्वपूर्ण विषयाचा समावेश पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रम केला पाहिजे. जळगांव विद्यापीठाने यांची सुरुवात केली आहे, असेही ते म्हणाले. तर ’अर्थ का अभाव भी न ही होना चाहिये और अर्थ का प्रभाव भी नहीं होत ना चाहिए’ हा विचार प्रत्येक भारतीयांनी अंगिकारला पाहिजे,असे डॉ.नितीन खर्चे म्हणाले.
डॉ.उजेंद्र कुलकर्णी म्हणाले, पंडित दिनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या ’एकात्म मानवदर्शन’ या विचारांचे हे हीरक महोत्सवी वर्ष होत आहे. या निमित्त दोन्ही विद्यापीठांनी अत्यंत महत्वपूर्ण चर्चा घडवून आणली. एकात्म मानव दर्शनाची मूलभूत तत्त्वे समजून घेणे, अंत्योदयाची संकल्पना आणि तिचा सामाजिक परिणाम समजून घेणे, कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वावलंबन साधणे, ग्रामीण विकासासाठी तत्त्वज्ञानाचा वापर समजून घेणे, एकात्म मानव दर्शनावर आधारित आर्थिक विकास आदी बाबी समजून घेणे महत्त्वाचे आहे, असे डॉ.उपेंद्र कुलकर्णी म्हणाले. तर प्रा.संजय साळवे यांनी ’एकात्म मानव दर्शनातील कौटुंबिक चिंतन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ.जीजा राऊत यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. डॉ.प्राजक्ती वाघ यांनी सूत्रसंचालन तर डॉ.ज्ञानेश्वर पाथ्रीकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रवीण निदार, श्याम बनसवाल यांच्यासह स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis