नांदेड, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।
जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नांदेड यांच्या वतीने यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण व सराव सत्र आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन एनडीआरएफ पुणे येथील कमांडर राजेंद्र कांबळे यांच्या पथकाने केले.
पुर, भूकंप, आग यांसारख्या आपत्ती परिस्थितीत स्वतःचा आणि इतरांचा बचाव कसा करावा तसेच आपत्ती काळात योग्य प्रतिसाद आणि समन्वय कसा ठेवावा याबाबत प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. जी. एन. शिंदे, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. कैलास इंगोले, प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच म. फुले विद्यालय येथील विद्यार्थ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.
जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे संचालन व समन्वय निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे आणि प्राधिकरणाचे सहायक बारकुजी मोरे हे या उपक्रमाचे समन्वयक आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis