रायगड, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। कर्जत-खोपोली परिसरात राजकीय चर्चेचे वादळ उठवणारा एक नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये वकील आरडे यांच्या पत्नीने आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याने स्थानिक राजकीय वातावरण तापले आहे.
सदर व्हिडिओमध्ये वकील आरडे यांच्या पत्नीने आमदार थोरवे यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्यावर मानसिक त्रास व पतीचे अपहरण केल्याचा आरोप केला असून काही विशिष्ट शासकीय व्यवहार आणि प्रकल्पांमध्ये दबाव टाकण्यात आल्याचा देखील उल्लेख त्यांनी केला आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात नवे वादळ निर्माण झाले आहे.
या आरोपांबाबत आमदार महेंद्र थोरवे यांनी तात्काळ स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले – “आरडे वकील कोण आहेत, त्यांचा परिवार कोण आहे हे मला मुळीच माहित नाही. माझा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही. हे आरोप पूर्णपणे खोटे असून माझ्या प्रतिमेवर डाग आणण्याचा हा प्रयत्न आहे.” थोरवे यांनी पुढे सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलीस करतील आणि सत्य सर्वांसमोर येईल. “मी स्वतः या विषयावर कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, कर्जत पोलिसांकडून प्राथमिक तपास सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आरडे यांच्या पत्नीचे निवेदन आणि संबंधित पुरावे तपासले जात आहेत. अशी माहिती स्थानिक पोलिसांकडून मिळाली.
या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, विरोधकांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात महिलेला न्याय मिळावा, तसेच जनप्रतिनिधींनी पारदर्शकतेचा आदर्श ठेवावा, अशी मागणी केली आहे.
या आरोपांमागे नेमके सत्य काय आहे, हे दोन पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार असले तरी, कर्जतच्या राजकारणात या घटनेने मोठी चर्चा रंगली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके