नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय ‘पर्पल फेस्ट’च्या दुसऱ्या दिवशी, दिव्यांग व्यक्तींसाठी ऐकणे, वाचणे आणि लेखन या क्षेत्रांमध्ये सुगम्यता वाढविण्यासाठी तीन परिवर्तनशील उपक्रम सुरू करण्यात आले. हे उपक्रम सर्वसमावेशक शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. या उपक्रमांमधून शिक्षणातील अडथळे दूर करण्याच्या आणि दिव्यांग व्यक्तींना जागतिक शिक्षण व व्यावसायिक संधींमध्ये पूर्ण सहभाग घेण्यास सक्षम करण्याच्या सरकारच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे प्रतिबिंब दिसते.
पहिला प्रमुख उपक्रम म्हणजे ‘दिव्यांग व्यक्तींसाठी आयईएलटीएस प्रशिक्षण पुस्तिका’ हे बिलीव्ह इन द इन्विंसीबल (बीआयटीआय) या संस्थेने सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या (डीईपीडब्ल्यूडी) सहकार्याने तयार केले आहे. या पुस्तिकेचे लेखन बीआयटीआयच्या सहसंस्थापिका आणि ब्रिटिश कौन्सिल मान्यताप्राप्त आयईएलटीएस प्रशिक्षक अंजली व्यास यांनी केले आहे. अशा प्रकारातील हे पहिलेच सर्वसमावेशक साधन असून दिव्यांग व्यक्तींसाठी आयईएलटीएस तयारी अधिक सुलभ, संरचित आणि शिकणाऱ्यांना अनुकूल बनविण्याचा उद्देश आहे.
दुसरी मोठी घोषणा भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (आयएसएलआरटीसी ) , नवी दिल्ली, (सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग) या शिखर संस्थेकडून करण्यात आली. ही संस्था भारतीय सांकेतिक भाषेच्या विकास, संशोधन आणि प्रशिक्षणासाठी कार्यरत आहे. दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या कौशल्य प्रशिक्षण उपक्रमाचा एक भाग म्हणून, आयएसएलआरटीसी ने SODA (बधिर प्रौढांचे भावंड) आणि CODA (बधिर प्रौढांची मुले) साठी रिकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग (RPL) - सर्टिफिकेशन इन ISL इंटरप्रिटेशन (CISLI) / स्किल कोर्स यशस्वीरित्या आयोजित केला.
भारतीय सांकेतिक भाषेतील व्यावसायिकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभव देण्याच्या गरजेला प्रतिसाद म्हणून, आयएसएलआरटीसीने अमेरिकेच्या सांकेतिक भाषा (एएसएल) आणि ब्रिटिश सांकेतिक भाषा (बीएसएफ) यांवरील विशेष प्राथमिक प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर केला. हा एक महिन्याचा (4 आठवड्यांचा) प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रम 3 डिसेंबर 2025 पासून आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त आयएसएलआरटीसी, नवी दिल्ली येथे सुरू होईल. या कार्यक्रमाचा उद्देश आयएसएल व्यावसायिकांना एएसएल आणि बीएसएलच्या मूलभूत ज्ञानाशी परिचित करणे, त्यांचे व्याकरण, संरचना आणि शब्दसंग्रह समजावणे, तसेच भारतीय दुभाष्यांसाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरील व्यावसायिक संधी बळकट करणे, हा आहे. या उपक्रमामुळे आयएसएलआरटीसीची भूमिका अधिक दृढ होईल आणि आंतरराष्ट्रीय मूकबधिर पर्यटकांना भारतीय संस्कृती व वारशाचा परिचय होईल.
दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शिकण्याची, संवाद साधण्याची आणि प्रगती करण्याची सुलभ, समावेशक आणि सशक्त, अशी वाट उपलब्ध करून देण्याचा एकत्रित दृष्टीकोन हे तीन उपक्रम दर्शवितात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule