सोलापूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।
गेल्या सहा महिन्यांपासून पक्षश्रेष्ठींशी चर्चा होऊनही कुठलाही तोडगा निघाला नाही. मला डावलून परस्पर पदाधिकारी निवडी केल्या. माझी दखलही घेतली जात नसल्यामुळे यापुढे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला रामराम करीत आहे. यापुढे उत्तर सोलापूर तालुक्यातील शरद पवार राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी राजीनामे देऊन आम्ही अपक्ष जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक मोठ्या ताकदीने लढणार आहोत, अशी घोषणा ज्येष्ठ नेते बळिराम साठे यांनी केली.
शरद पवार गटात दखल घेतली जात नसल्याने नाराज असलेले ज्येष्ठ नेते बळिराम साठे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला होता. पुढील निर्णय घेण्यासाठी वडाळा (ता. उ. सोलापूर) येथे आयोजित समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
ते म्हणाले, मी यापूर्वी जिल्हा परिषदेवर सत्तेत असताना मोहिते- पाटील गटाच्या सहा सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली होती. याची खुन्नस धरून धैर्यशील मोहिते- पाटील हे माझ्या विरोधात पक्षात षड्यंत्र रचत आहेत. त्यांच्या साथीला आमदार अभिजित पाटीलही आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कामे होण्यासाठी कोणत्या पक्षात प्रवेश करायचा, हा निर्णय सध्या स्थगित ठेवला आहे. यासाठी निवडणुकीनंतर या संदर्भात निर्णय घेतला जाईल. माजी आमदार यशवंत माने यांनी माझे राजकारण संपवण्याचा विडा उचलला आहे. उत्तर तालुक्यातील कार्यकर्त्यांना आमिष दाखवून कार्यकर्ते फोडण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहेत. यासाठी कार्यकर्त्यांनी सावधगिरी बाळगून आगामी निवडणुका जिंकण्यासाठी तयार व्हावे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड