पुणे, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।
घाटमाथ्यासह चारही धरणक्षेत्रात मान्सूनने निरोप घेतला आहे. सध्या खडकवासला धरणसाखळीत 29.04 टीएमसी म्हणजे 99.65 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीही एवढाच साठा होता. त्यामुळे पुणेकरांसह जिल्ह्यातील एक कोटी रहिवाशांसह 66 हजार हेक्टर शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे.
यंदा 15 मे पासून 5 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे जवळपास साडेचार महिने धरणक्षेत्रात दमदार पाऊस पडला. त्यामुळे जादा पाणी सोडूनही धरणसाखळी शंभर टक्के भरली आहे. खडकवासला धरणाच्या लाभ क्षेत्रातील इंदापूर, दौंड परिसरात जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे अद्यापही रब्बी आवर्तनाची मागणी आली नाही. सध्या खडकवासलातून केवळ पिण्यासाठी पाणी सोडले जात आहे.
धरणसाखळीची पाणी साठवणक्षमता 29.15 टीएमसी इतकी आहे. आत्तापर्यंत पावसाळ्यात क्षमतेच्या अडीच पट पाणी धरणसाखळीत जमा झाले. त्यातील 27.91 टीएमसी पाणी मुठा नदीतून उजनी धरणात सोडले. तर पुणे शहर व परिसराला साडेचार महिन्यांत जवळपास 8 टीएमसी तर मुठा कालव्यात शेतीला 6 टीएमसी पाणी सोडण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु