पुणे, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।सरकारी शाळांचे रूपांतर गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये करणे काळाची गरज आहे. यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे विचार वर्ल्ड बेस्ट स्कूल पुरस्कार मिळवणारे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे गुरुजी यांनी मांडले.शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे आयोजित पुरस्कार वितरण व शिष्यवृत्ती वाटप उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, उद्योगपती कैलास काटकर उपस्थित होते.
याप्रसंगी दत्तात्रय वारे गुरुजी आणि उद्योजक कैलास काटकर यांना ‘शिवसह्याद्री आधारवड पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. चंद्रकांत पाटील म्हणाले, जर्मनीमध्ये तरुणांची संख्या घटत असून, वृद्धांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे शिक्षण व रोजगाराच्या क्षेत्रात तरुणांची मोठी गरज निर्माण झाली आहे. परदेशात शिक्षण व रोजगारासाठी महाराष्ट्रातील तरुणांसमोर मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत असून, जर्मनी व जपानकडून राज्यातील मनुष्यबळाची मोठी मागणी आहे.यावेळी फाउंडेशनच्या निधीतून मिळालेल्या व्याजातून एकूण १ कोटी ८० लाख रुपयांच्या ठेवींच्या व्याजातून ९० विद्यार्थ्यांना ११ लाखांचे शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले. मराठवाडा व सोलापूरमधील पूरग्रस्त भागातील ८३ विद्यार्थ्यांना १५ लाखांचे शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु