लातूर शहरात वाहतूक शिस्त प्रस्थापित करण्यासाठी लातूर पोलिसांची विशेष मोहीम
लातूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.) लातूर शहरात वाहतूक शिस्त प्रस्थापित करण्यासाठी लातूर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत ब्लॅक फिल्म लावणारे वाहनचालक, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणारे, तसेच नियमांचे उल्लंघन करणारे ऑटोरिक्षा चालक यांच्या
लातूर शहरात वाहतूक शिस्त प्रस्थापित करण्यासाठी लातूर पोलिसांनी विशेष मोहीम


लातूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.) लातूर शहरात वाहतूक शिस्त प्रस्थापित करण्यासाठी लातूर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत ब्लॅक फिल्म लावणारे वाहनचालक, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणारे, तसेच नियमांचे उल्लंघन करणारे ऑटोरिक्षा चालक यांच्यावर ई-चलान मशिनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी मा. समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वात ही मोहीम सुरू आहे. या कारवाईत आतापर्यंत १३७ अॅटोचालकांवर केसेस दाखल करून २ लाख ९ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, तसेच ओव्हर स्पीड प्रकरणांमध्ये ४४ वाहनांवर कारवाई करून ८८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

अनेक अॅटोरिक्षाचालकांनी फ्रंट सीटवर प्रवासी घेणे, गणवेश न परिधान करणे, दुहेरी रांग लावून चौकात थांबणे, तसेच नियमभंग करून प्रवासी चढ-उतार करण्यामुळे नागरिकांना अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारींनंतर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.तसेच, ज्या वाहनधारकांनी ई-चलान दंड थकवले आहेत, त्यांच्या प्रकरणांची न्यायालयात खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८५ नुसारही गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

लातूर पोलिसांकडून जनतेला आवाहन करण्यात आले आहे की, वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, वाहनाची सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत, आणि शिस्तबद्ध वाहतूक करण्यास पोलिसांना सहकार्य करावे. ही मोहीम पुढील काळात अधिक तीव्र करण्यात येणार असून, सातत्याने राबविली जाणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande