मुंबई, 14 ऑक्टोबर, (हिं.स.) : “नेहमी ‘ऑनलाईन’ मंत्रालयात येणारे उद्धव ठाकरे आज अखेर प्रत्यक्ष मंत्रालयात दिसले, पण कामासाठी नाही, तर तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी आले!” असा झणझणीत टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यांनी विरोधकांवर तुफान शब्दप्रहार करत म्हटलं, “महाविकास आघाडी नव्हे, महा ‘कन्फ्युज’ आघाडी आहे. त्यांना स्वतःलाच समजत नाही की कोण काय बोलतंय, आणि कोणाचा कोणालाही मागमूस नाही फक्त गोंधळ आणि दिखावा आहे.”
शिंदे पुढे म्हणाले, “राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी, पूरग्रस्तांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी खऱ्या अर्थाने काम करत आहे. आम्ही दिलेल्या भरीव मदतीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेला विजयाचा विसर विरोधकांना पडला आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव निश्चित दिसताच त्यांनी तक्रारी करत रडीचा डाव सुरू केला आहे.”
“महाविकास आघाडीला विजय मिळाला तेव्हा निवडणूक आयोग आणि न्यायालय अगदी योग्य वाटले; पण पराभवाचा वास लागताच त्यांच्यावरच आरोप सुरू होतात. ही त्यांची जुनी सवय आहे,” असा घणाघात शिंदे यांनी केला.
“महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. ती काम करणाऱ्यांच्या, विकास साधणाऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या तसेच लोकाभिमुख लोक कल्याणकारी योजना राबवणाऱ्या महायुतीसोबतच राहील. विरोधक कितीही एकत्र आले तरी येत्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा विजय अटळ आहे.” असा पुनरुच्चारही त्यांनी केला.
दरम्यान, राज्य सरकारच्या सर्व योजना सुरळीतपणे सुरू असून, प्रत्येक निर्णय जनतेच्या हितासाठी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर