रायगड, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।
उद्योग आणि शिक्षण यांच्यातील दुवा घट्ट करण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण व विकास संस्थेत 'कॅटलिस्ट' २०२५ चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. विद्यानगरी परिसरातील ग्रीन टेक्नॉलॉजी सभागृहात या कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी केले.
लॉजिस्टिक्स, पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि कस्टम्स क्लिअरन्स या क्षेत्रातील विद्यार्थी-निर्मित प्रोटोटाइप्स आणि ५० हून अधिक नवकल्पनांचे सादरीकरण झाले. समुह चर्चा, तज्ज्ञ संवाद सत्रे आणि संवादात्मक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना उद्योगजगताशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांसाठी आणखी सुवर्णसंधी म्हणजे 'शिकाऊ उमेदवारी एकात्मिक पदवी कार्यक्रम' अंतर्गत प्रत्यक्ष उद्योगाधारित अनुभव मिळवण्यासाठी देशातील १३ प्रमुख उद्योगसंस्थांसोबत सामंजस्य करार झाले. ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप कल्पना आणि लॉजिस्टिक सप्लाय चेन क्षेत्रातील नवोन्मेष सादरीकरणे करण्यात आली.
यावेळी नाव्हा शेवाचे (कस्टम निर्यात) अतिरिक्त आयुक्त रघु किरण, कार्यकारी संचालक इपीसी रवी कुमार, गरवारे संस्थेचे संचालक डॉ. केयूरकुमार नायक आणि अभ्यासक्रम समन्वयक प्रकाश खत्री यांसह उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या दोन दिवसीय परिषदेमध्ये सहा पॅनल चर्चासत्रे आणि चार मास्टर क्लासेस घेण्यात आले ज्यामध्ये ४०० हून जण सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत घेण्यात आलेला कॅटलिस्ट उपक्रम हा भारताला जागतिक लॉजिस्टिक केंद्र म्हणून घडवण्या साठी , तसेच देशाला कार्यक्षम डिजिटल आणि शाश्वत विकासाकडे नेण्यासाठीच्या वचनबद्धतेचे प्रतिक आहे. ज्यामुळे विकसित भारताचे स्वप्न साकार होण्यास सहाय्य मिळेल..
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके